खामगाव : सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करात सूट; मीरा देशमुख ठरल्या पहिल्या मानकरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 10:06 PM2017-12-29T22:06:38+5:302017-12-29T23:20:00+5:30
खामगाव: संरक्षण दलातील शौर्य पदक धारकांसोबतच माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करात सूट देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचा पहिला मान श्रीमती मीरा रमेशचंद्र देशमुख यांना मिळाला आहे. ३१ डिसेंबर अखेरीस श्रीमती मीरा देशमुख यांचा संपूर्ण मालमत्ता कर पालिकेने माफ केला आहे.
अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: संरक्षण दलातील शौर्य पदक धारकांसोबतच माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करात सूट देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचा पहिला मान श्रीमती मीरा रमेशचंद्र देशमुख यांना मिळाला आहे. ३१ डिसेंबर अखेरीस श्रीमती मीरा देशमुख यांचा संपूर्ण मालमत्ता कर पालिकेने माफ केला आहे.
सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढणा-या, बलिदान देणा-या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खामगाव नगर पालिकेने माजी सैनिकांच्या विधवांसोबतच संरक्षण दलातील शौर्य पदक धारकांनाही मालमत्ता करातून सूट देण्याचा ठराव मंजूर केला होता. शौर्य पदक प्राप्त करणा-यांचा यथोचित गौरव करण्यासोबतच, देशासाठी बलिदान, सेवा देणा-या सैनिकांप्रती आत्मियताही प्रकट करण्याचा पालिकेचा यामागील उद्देश असून दरम्यान, मालमत्ता करात सूट देत, सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारी खामगाव नगर पालिका जिल्ह्यातील एकमेव पालिका ठरली आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासन अधिनियम १९६५ चे कलम १०६ च्या पोट कलम (१), (२) अन्वये नगर पालिकेने विनिर्दिष्ठ करण्यात आलेल्या करापासून कोणत्याही वर्गातील मालमत्तेच्या किंवा व्यक्तीच्या संबधात सूट देवू शकते. देण्यात आलेल्या सूटी मुळे, नगर परिषदेला येणाºया तुटीची प्रतिपूर्ती शासनाकडून परत करता येईल. यासंदर्भात सूट देण्याचा शासनाचा अद्यादेशही आहे. त्यामुळे पालिकेच्या या निर्णयामुळे पालिकेचे कोणतेही नुकसान होणार नाही.
नगरसेवक बोर्डे यांनी मांडला होता ठराव!
माजी सैनिकांच्या विधवांसोबतच उत्कृष्ठ कामांमुळे शौर्य पदक प्राप्त करणाºया सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा ठराव नगरसेवक हिरालाल बोर्डे यांनी सभेसमोर मांडला. या ठरावाला आरोग्य सभापती राजेंद्र धनोकार यांनी अनुमोदन दिल्यानंतर सर्वांनुमते हा ठराव पारीत करण्यात आला होता. याठरावाबाबत नगराध्यक्ष अनिता डवरे, उपाध्यक्ष संजय पुरवार यांच्यासह नगरसेवकांनी बोर्डे यांचा गौरवही केला होता.
शहरातील इतरांनाही मिळणार लाभ!
खामगाव नगर पालिका क्षेत्रातील माजी सैनिकांची यादी सैनिक कल्याण बोर्डांकडून मागविण्याच्या सूचना नगरसेवक हिरालाल बोर्डे यांना देत, खामगाव मतदार संघाचे आ. आकाश फुंडकर यांनी यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यानुसार नगरसेवक तथा माजी सैनिक हिरालाल बोर्डे यांच्या पुढाकारात पालिका प्रशासनाने सैनिक कल्याण बोर्डांशी पत्रव्यवहार चालविला आहे.
देशासाठी बलिदान देणाºया सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय खामगाव पालिकेने घेतला आहे. या निर्णयाचा पहिला मान माजी सैनिक विधवा पत्नी मीरा रमेशचंद्र देशमुख यांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे.
- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी, खामगाव
देश रक्षणार्थ लढणाºया पतीच्या कार्याचा गौरव म्हणून खामगाव पालिकेने मालमत्ता कर माफ केला आहे. प्रथम दर्शनी ही लहानशी बाब असली तरी, पतीच्या कार्याची दखल म्हणून ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या देशसेवेचे या निमित्ताने फलित झाले आहे.
- श्रीमती मीरा देशमुख, खामगाव