खामगावकरांवर पाणी कपातीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:23 AM2017-08-14T00:23:43+5:302017-08-14T00:25:34+5:30

खामगाव : खामगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या ज्ञानगंगा प्रकल्पात केवळ २३ टक्के जलसाठा असून, पावसाअभावी पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या भविष्यात जाणवू शकते. त्यामुळे नगरपालिकेकडून पाण्याचे नियोजन करण्यात येत असून, यांतर्गत पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. त्यामुळे सध्या सातव्या दिवशी होत असलेला पाणीपुरवठा नवव्या दिवसावर जाऊ शकतो. तसेच पाणीपुरवठय़ाची वेळही कमी होऊ शकते.

Khamgaonkar water leakage crisis! | खामगावकरांवर पाणी कपातीचे संकट!

खामगावकरांवर पाणी कपातीचे संकट!

Next
ठळक मुद्देअपुर्‍या जलसाठय़ामुळे करावे लागणार नियोजन पाणीपुरवठा लांबण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : खामगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या ज्ञानगंगा प्रकल्पात केवळ २३ टक्के जलसाठा असून, पावसाअभावी पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या भविष्यात जाणवू शकते. त्यामुळे नगरपालिकेकडून पाण्याचे नियोजन करण्यात येत असून, यांतर्गत पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. त्यामुळे सध्या सातव्या दिवशी होत असलेला पाणीपुरवठा नवव्या दिवसावर जाऊ शकतो. तसेच पाणीपुरवठय़ाची वेळही कमी होऊ शकते.
खामगाव शहराला गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो; परंतु यावर्षी खामगावसह धरण परिसरात समाधानकारक पाऊस पडला नाही. संपूर्ण जिल्ह्यातच अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ज्ञानगंगा धरणासह बहुतांश धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे. ज्ञानगंगा धरणात फक्त २२.९६ टक्के एवढा जलसाठा असून, हा जलसाठा अपुरा असल्याचे दिसून येते. सध्या पिकांसाठी पावसाची नितांत गरज असताना पाऊस पडत नसल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याची चिंता सतावू लागली आहे. 
धरणांमधील जलसाठय़ांवर अवलंबून असलेल्या विविध शहरांच्या पाणीपुरवठा योजना अडचणीत सापडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. खामगाव शहराची तहान भागविणार्‍या ज्ञानगंगा धरणात सुध्दा अपुरा जलसाठा असल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ शहरवासीयांवर येऊ शकते. भविष्यातील पाण्याची तजवीज करण्याकरिता पाणी कपातीसारखा कटू निर्णय पालिकेला घ्यावा लागणार आहे. परिणामी, पाणीपुरवठय़ाचा कालावधी लांबणे, पाणीपुरवठय़ाची वेळ कमी होणे अशा निर्णयांना सामोरे जाण्याची वेळसुद्धा शहरवासीयांवर येऊ शकते. 

पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची गरज
संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असून, पाऊस नसल्याने शेतकर्‍यांसोबतच व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिक धास्तावलेले आहेत. किमान पिण्यासाठी तरी पुरेसे पाणी मिळणार की नाही, अशी चिंता शहरवासीयांना सतावत आहे. त्यामुळे भविष्यात बिकट स्थितीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, किंबहुना पाणीटंचाईची तीव्रता कमी व्हावी, याकरिता नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे बनले आहे. 
पावसाळ्यात जलसंधारणाच्या कामांकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नाही. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत आग्रह धरला जात नाही. त्यामुळे तहान लागल्यावर विहीर खोदण्याची वेळ उन्हाळ्यात येत असते.

सध्या उपलब्ध जलसाठय़ाचा वापर जपून करणे गरजेचे आहे. याकरिता नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन करण्यात येत असून, पाणी कपातीचा विचार सुरू आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नसला, तरी भविष्यात तसा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे शहरवासीयांनी पाण्याचा वापर जपून करावा व या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. 
-सतीशआप्पा दुडे, सभापती, पाणीपुरवठा विभाग

Web Title: Khamgaonkar water leakage crisis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.