स्वच्छतेसाठी खामगावकरांची नकारघंटा; ‘स्वच्छता अॅप’ डाऊनलोडींगला थंडप्रतिसाद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:37 PM2018-01-13T12:37:43+5:302018-01-13T12:39:37+5:30
खामगाव: शहर स्वच्छतेसाठी खामगावकरांचा थंड प्रतिसाद ही मुख्य अडसर ठरत असल्याचे दिसून येते. ‘स्वच्छता’ अॅप डाऊनलोडींगसाठीही खामगावकरांची नकारघंटा कायम असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहर स्वच्छतेसाठी खामगावकरांचा थंड प्रतिसाद ही मुख्य अडसर ठरत असल्याचे दिसून येते. ‘स्वच्छता’ अॅप डाऊनलोडींगसाठीही खामगावकरांची नकारघंटा कायम असल्याचे चित्र आहे.
स्वच्छ भारत अभियानाच्या धरतीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत राज्यातील विविध शहरांमध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहिम राबविण्यात येत असून, या मोहिमेच्या जनजागृतीचा एक भाग असलेल्या ‘स्वच्छता’ अॅप डाऊनलोडींगला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. याबाबत पालिकेकडून जनजागृती करूनही आतापर्यंत ७३० लोकांनीच हे अॅप डाऊनलोड केले आहे. अडीच हजाराचे उद्दीष्ट असताना केवळ ७३० लोकांनीच स्वच्छ अॅप डाऊन लोड केल्याने, खामगावात स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रतिसादाच्या अडथळ्यात सापडल्याचे दिसून येते. फेब्रुवारी महिन्यात (क्यूसीआय) समिती तपासणीसाठी येणार आहे. यापार्श्वभूमीवर शहर स्वच्छतेसाठी नगर पालिका प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छता कशी करात येईल, याबाबत प्रयत्न केले जात आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये देशातील शहरांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये खामगाव शहर ४१५ व्या स्थानी असून, शहर स्वच्छतेसाठी पालिका प्रशासनासोबतच पालिका पदाधिकाºयांनी पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छता अॅप’ सुरू करण्यात आले आहे. या अॅपद्वारे आपल्या परिसरातील तक्रारी पालिकेपर्यंत पोहचविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, या स्वच्छता अॅपला खामगाव शहरातील नागरिकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.
अॅप डाऊनलोडींगसाठी पालिकेची वारी!
शहरातील नागरिकांना ‘स्वच्छता अॅप’ डाऊनलोडींग करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी पालिकेच्या एका कर्मचाºयाला प्रत्येकी २०- २५ जणांचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्या दृष्टीकोनातून पालिकेच्या विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी व्यापारी गाळे, शाळा- महाविद्यालय आणि घरोघरी भेटी देऊन याबाबत जनजागृती करीत आहेत.
खामगावकरांचा थंड प्रतिसाद!
खामगाव शहरासाठी सुरूवातीला अॅप डाऊनलोडींगसाठी अडीच हजाराचे उद्दीष्ट आहे. मात्र, आतापर्यंत प्रत्यक्षात ७३० जणांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामध्ये ७०५ अँड्रॉईड मोबाईल धारक असून ०५ जणांकडे (आयओएस) सिस्टीम मोबाईल धारकांचा समावेश आहे. तर सिटी अॅपला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते.