खामगावचा भाजी बाजार अतिक्रमणाच्या विळख्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 03:43 PM2020-01-05T15:43:36+5:302020-01-05T15:43:44+5:30
शहरातील मुख्य रस्ते, प्रमुख बाजारपेठा, आठवडी बाजार अतिक्रमणाने व्यापला असतानाच, आता रविवारच्या भाजी बाजारातही अतिक्रमण पोफावत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातील अतिक्रमण निर्मुलनासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे शहरातील विविध रस्ते आणि मैदांना अतिक्रमणाचा विळखा असतानाच, आता चक्क रविवारचा भाजी बाजारही अतिक्रमणाच्या विळख्यातून सुटला नसल्याचे दिसून येते.
खामगाव शहरातील गुरूवारी आठवडी बाजार भुसावल चौक परिसरात भरतो. तर भाजी बाजार मुख्य रस्त्यावर भरतो. दरम्यान, शहरातील मुख्य रस्ते, प्रमुख बाजारपेठा, आठवडी बाजार अतिक्रमणाने व्यापला असतानाच, आता रविवारच्या भाजी बाजारातही अतिक्रमण पोफावत आहे. गत काही दिवसांपासून भाजी बाजारातील खुल्या जागा पक्के अतिक्रमण करून बळकाविल्या जात आहे. भंगार, कुट्टी तसेच इतर व्यवसायासाठी या ठिकाणी काही लोखंडी स्टॉल आणून ठेवल्या जाताहेत. तर काही ठिकाणी टिनाचे शेड उभारण्यात आले आहे. त्यामुळे भाजी बाजारात भाजी विक्रेते आणि ग्राहकांसाठी जागा अपुरी पडत आहे. मात्र, या अतिक्रमणाकडे नगर पालिका प्रशासनासह पोलिस प्रशासनाचेही अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
अतिक्रमणाला पालिकेचे अभय !
पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण निमुर्लनासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही. त्यामुळे नगर पालिकेच्या हद्दीतील शहर पोलिस स्टेशन रस्त्यावर गत तीन वर्षांत अतिक्रमण जागेवर मोठमोठी पक्की दुकाने थाटण्यात आली आहेत. नगर पालिका आवारालाही अतिक्रमणाचा विळखा आहे. बसस्थानक चौक, शहर पोलिस स्टेशन चौक, टॉवर चौक, जलंब रोड, नांदुरा रोडवर आणि घाटपुरी रोड, चिखली रोडवरही मोठ्याप्रमाणावर अतिक्रमण आहे.अतिक्रमण सध्या मोठी डोकेदुखी ठरत आहे. शहराच्या अनेक भागात अतिक्रमकांनी दुकाने थाटली आहे. यावरून अनेक ठिकाणी वादही होत असल्याचे दिसून येते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
अतिक्रमणामुळे वाद वाढीस!
अतिक्रमणाच्या जागेवरून वाढ वाढीस लागल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वीच अतिक्रमणाच्या जागेच्या वादातून घाटपुरी रोडवर दुहेरी हत्याकांड घडले. दरम्यान, बसस्थानक चौकातही दोन अतिक्रमकांमध्ये वाद उद्भवला होता. हा वाद पोलिसांपर्यंत पोहोचला होता. शहर पोलिस स्टेशनसमोरील एका अतिक्रमणावरून एकाच समाजाच्या दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला होता. सामान्य रूग्णालयासमोर अतिक्रमण माफियांचे साम्राज्य वाढीस लागले आहे. जागा मिळवून देण्यासाठी काही गल्लीदादा पुढे येताहेत. त्यामुळे आगामी काळात अतिक्रमणाच्या वादातून एखादी विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.