सात लाख हेक्टरवर होणार खरीप पेरणी!
By Admin | Published: May 16, 2017 12:41 AM2017-05-16T00:41:06+5:302017-05-16T00:41:06+5:30
चांगल्या पावसाचे संकेत : १ लाख ३६ हजार ५३९ क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : या पावसाळ्यामध्ये चांगल्या पावसाचे संकेत असल्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीला शेतकरी मोठ्या जोमाने लागले आहेत. जिल्ह्यात ७ लाख ४७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या लागवडीचे उद्दिष्ट आहे. खरीप हंगामाकरिता जिल्ह्यात पेरणीसाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रावर सर्व पिकांच्या १ लाख ३६ हजार ५३९ क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने खरीप पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे बियाणे व खतांची कमतरता पडणार नाही, असे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. महावितरणने त्यांच्याकडील मान्सूनपूर्व वीज यंत्रणेची कामे पूर्ण करण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू आहे. रखडलेल्या वीज जोडण्या गतीने पूर्ण करून जळालेले रोहित्र बदलून देण्यात येत आहेत.
जिल्ह्यात २०१७ -१८ मध्ये ७ लाख ४७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. खरीप हंगामाकरिता जिल्ह्यात पेरणीसाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रावर सर्व पिकांच्या १ लाख ३६ हजार ५३९ क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महाबीज, राष्ट्रीय बियाणे निगम यांच्याकडील ३८ हजार ५८० आणि खासगी बियाणे कंपन्यांकडून ९७ हजार ९५९ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे. खरीप हंगामाच्या पेरणीमध्ये खत व बियाणे कमी पडणार नाही, यासाठी कृषी विभागाकडून पूर्वनियोजन करण्यात आले असून, अनेक शेतकरी खत व बियाणे खरेदी करताना दिसत आहेत, तर काही शेतकरी खत, बियाण्यासाठी पैशाची जुळवा-जुळव करीत आहेत. जिल्ह्यात प्रशासनाकडून खरीपपूर्व हंगामाची तयारी जोमात सुरू असल्याचे दिसून येते.
पेरणीच्या नियोजनात शेतकरी व्यस्त
खरीप हंगाम जवळ येत असल्याने त्यासाठी लागणाऱ्या बी- बियाणे व खते खरेदी करण्यासाठी शेतकरी पैशाची जुळवाजुळव करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी उधारीत बियाणे व खते खरेदीसुद्धा केले आहे. खरीप पेरणीच्या नियोजनामध्ये सध्या शेतकरी व्यस्त असून, पैशासाठी बँकेतील पीक कर्जाचीही शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.