खामगावात 'खिचडी' वितरणाचा घोळ; प्रशासनाने झटकले हात
By अनिल गवई | Published: January 13, 2024 10:12 PM2024-01-13T22:12:07+5:302024-01-13T22:12:24+5:30
प्रशासनाने झटकले हात : पंचायत समिती, नगर पालिकेचा कुणाशीही करार नाही
खामगाव : शहरातील एका पेट्रोल पंपावर तसेच सार्वजनिक ठिकाणी खिचडी वितरित करण्यात आल्याचा व्हिडीओ शनिवारी व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली असून, ही 'खिचडी' नेमकी कुणाची याचा शोध युद्धपातळीवर घेण्यात येत आहे. तथापि, नगर पालिका आणि पंचायत समिती प्रशासनाने ही खिचडी शालेय पोषण आहाराची नसल्याबाबत खुलासा केला आहे.
याबाबत सविस्तर असे की, शहरातील एका पेट्रोल पंपावर खिचडी वितरणाचा व्हिडीओ शनिवारी समाज माध्यमात तसेच प्रसार माध्यमात व्हायरल झाला. विद्यार्थ्यांना शाळेत वितरित केली जाणारी खिचडी पेट्रोल पंपावर तसेच सार्वजनिक वितरित केली जात असल्याचे सुरुवातीला समोर आले. त्यामुळे शिक्षण विभागात एकच तारांबळ उडाली. तथापि, नगर पालिका आणि पंचायत समिती प्रशासनाकडून या बाबीचे खंडन करीत शालेय पोषण आहाराची खिचडी शिजविण्यासाठी कुणाशीही करार करण्यात आला नसल्याचे खंडन करण्यात आले. त्यामुळे शनिवारी दिवसभर शहरात खिचडी वितरणाचा घोळ कायम होता. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अंगणवाडीत खिचडी शिजविणे बंद असल्याने, ही खिचडी नेमकी कुणाची, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
खिचडी की आणखी काही
शहरातील एका सामाजिक संस्थेकडून सामान्य रुग्णालयात तसेच गाेरगरिबांना सकाळ-सायंकाळ नाश्त्याचे वितरण होते. वितरित नाश्ता या संस्थेचा असल्याचेही या निमित्ताने समोर येत आहे. याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पृष्टी केली आहे.
नगर पालिका प्रशासनाकडून कोणत्याही खासगी कंत्राटदाराला खिचडी शिजविण्याचे कंत्राट देण्यात आलेले नाही. त्यामुळे एखाद्या सामाजिक संस्थेकडून खाद्यपदार्थाच्या वितरणाला वाव आहे.
आनंद देवकते
प्रशासन अधिकारी, नगर परिषद, शिक्षण विभाग, खामगाव.
शालेय पोषण आहारांतर्गत पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या शाळांमध्येच खिचडी शिजविण्यात येत आहे. खिचडी शिजविण्याचा खासगी कंत्राटदाराशी करार केलेला नाही. त्यामुळे वितरित करण्यात आलेल्या खाद्यपदार्थाचा शालेय पोषण आहाराशी अर्थाअर्थी संबंध नाही. यासंदर्भात चौकशी केली जात आहे.
- गजानन गायकवाड
गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, खामगाव.