व्रिकीसाठी झाले होते बाळाचे अपहरण: सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 08:09 PM2017-10-01T20:09:46+5:302017-10-01T20:12:57+5:30

Kidnapping: Six suspects arrested | व्रिकीसाठी झाले होते बाळाचे अपहरण: सहा जणांना अटक

व्रिकीसाठी झाले होते बाळाचे अपहरण: सहा जणांना अटक

Next
ठळक मुद्देखामगावातील अपहरण झालेले बाळ दिल्लीत !बाळ सुखरूप : पोलिस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी रविवारी पत्र परिषदेत दिली माहिती   




लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयातून २७ सप्टेंबर रोजी पळविण्यात आलेल्या बाळाचा शोध लागला असून, अपहृत  बाळ दिल्लीत सुखरूप असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी रविवारी पत्र परिषदेत दिली.  खामगाव शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या समांतर कारवाईत अवघ्या तीन दिवसांत अपहृत बाळाचा शोध लागल्याने, पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, विक्रीसाठीच मुलाचे अपहरण करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर असून, न्यायालयाच्या आदेशाने बाळ आई-वडिलांना सोपविण्यात आल्याचे समजते.
नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील सुमैय्याबी आतीकखान  यामहिलेचे ५ दिवसाचे बाळ २७ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३० वाजता एका बुरखाधारी महिलेने पळविले. ही घटना उघडकीस येताच खामगाव शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आरोग्य प्रशासनाच्यावतीने गंभीर दखल घेत, परिचारिका आणि सुरक्षा रक्षकाला बडतर्फ करण्यात आले होते. त्याचवेळी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकारणाचा समांतर तपास खामगाव शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्याच्या तपासात ३ वेगवेगळ्या पथक तयार केले. यामध्ये गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचा सपोनि मनोज केदारे यांच्या पथकाने शोध घेवून औरंगाबाद येथील नवीन बायजी पुरा येथे सापळा रचून  बाळ चोरीसाठी वापरलेल्या वाहनाचा चालक राजे जहांगीर खान(४०), वाहन भाड्याने करून देणारा  इरफान खान बशीर खान (२८) दोघेही रा. नवीन बायजी पुरा यांना ताब्यात घेतले. दोघांचीही चौकशी केली असता राजे जहागीर खान याने २६ सप्टेंबर रोजी खामगाव येथून बाळ आणण्यासाठी इमरान खानच्या मदतीने गाडी भाड्याने घेतली होती. त्यामुळे  मोहसिन हुसेन खान उपजिल्हा सामान्य रुग्णालयासमोर भेटला, दोन महिलांनी रुग्णालयातून बाळ आणल्यानंतर ते औरंगाबाद येथे पोहोचले. दरम्यान, बाळ चोरीसाठी वापरलेल्या गाडीच्या चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती  उपरोक्त तिघांना मिळताच मुख्य आरोपी मोहसीन,   त्याची पत्नी प्रिती दाविद गायकवाड व तिची आई  वेदीका किशोर पिल्ले हे तिघे जण तेथून फरार झाले. 
दरम्यान, अपहृत बालक आणि दोन महिला सुरूवातीला मुंबई आणि तेथून दिल्ली येथे गेल्याचे समजल्यानंतर बालकाच्या शोधासाठी  सपोनि मनोज केदारे यांच्या पथकाला दिल्ली येथे तर मोहसीनच्या शोधासाठी पोउपनि दिनकर गोरे यांच्या पथकाला मुंबई येथे रवाना करण्यात आले. तथापि, मुख्य आरोपी दौंड येथून पुण्याकडे येत असल्याची माहिती मिळाल्याने दिनकर गोरे यांनी दौंड रेल्वे पोलिसांच्या संयुक्त मदतीने मुख्य आरोपी मोहसीन हुसेन खान (२१), त्याची पत्नी प्रिती दावीद गायकवाड (पिल्ले) रा. खामगाव यांना दौंड येथून ताब्यात घेतले. त्याचवेळी सपोनि मनोज केदारे व त्यांच्या पथकाने दिल्ली येथून मल्लिका बेगम पठाण हिंमत खान रा. बाजार सावंजी जि. औरंगाबाद, फिरदोस अस्लम आसमानी रा. गल्ल नं.९ वजीराबाद, दिल्ल यांना ताब्यात घेतले. बाळ पळविण्यासाठी वापरलेले वाहन ताब्यात घेवून चालक राजे जहांगीर खान, इरफान खान, यांना  सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून खामगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

खामगाव पोलिसांकडून दुचाकी जप्त
या प्रकरणात खामगाव पोलिसांनी जप्त केलेल्या एम.एच. २८ एन ९८१० ही दुचाकी जप्त केली आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेली एम एच.४९ एफ १५९७ या गाडीचा चालक राजे जहांगीर खान हा इरफान खान याचा साळा असल्याची माहिती आहे.

खामगाव पोलिसांची पाच पथके!
या गुन्ह्याच्या समातंर कारवाई खामगाव शहर पोलिसांनी ५ पथके विविध दिशेने रवाना केली होती.  यामध्ये एपीआय गाढे यांच्या पथकाने जवळपास १०० गाड्यांची तपासणी केली. तर धुळे, इंदोर आणि मुक्ताईनगर येथे पाठविण्यात आलेल्या पथकाने आपली कामगिरी बजावली. दरम्यान, एका पथकाची नेमणूक सीसी फुटेज तपासण्यासाठी करण्यात आली. या पथकाने विविध फुटेज बुलडाणा एलसीबीला दिले.

Web Title: Kidnapping: Six suspects arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.