क्षारयुक्त पाण्यामुळे किडनीचा आजार, एकाचा मृत्यू
By विवेक चांदुरकर | Published: March 10, 2024 03:44 PM2024-03-10T15:44:36+5:302024-03-10T15:44:44+5:30
अकोला जिल्ह्यातील अकोट, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात अनेक गावे खारपाण पट्ट्यात येतात.
बोरखेड : संग्रामपूर तालुक्यातील सगोडा येथील संजय सिताराम पुरकर (वय ५२) यांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला. बोरखेड परिसरातील गावांमधील नागरिकांना क्षारयुक्त पाणी प्यावे लागत असल्याने अनेकांना किडनीच्या आजाराने ग्रासले आहे. गत एका वर्षात दोघांचा मृत्यू झाला आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात अनेक गावे खारपाण पट्ट्यात येतात. या गावांमध्ये विहिरींना क्षारयुक्त खारे पाणी लागते. हे पाणी नागरिकांना प्यावे लागत असल्याने किडणीचे आजार होतात. सगोडा येथील संजय पुरकर भूमिहीन असून यांची हालाखीची परिस्थिती असताना देखील त्यांनी अकोला येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये चार वर्षे उपचार घेतले.
सगोडा गावात अजूनही १४० गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी पोहचले नाही. या गावातील नागरिकांना क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. गत वर्षी सुद्धा गावातील शित्रे यांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला होता. संजय पुरकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा अशा आप्त परिवार आहे. शासनाने पूरकर यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य मदत देण्याची मागणी होत आहे.