धामणगाव बढे येथे असाही जातीय सलोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:37 AM2017-08-28T00:37:37+5:302017-08-28T00:37:37+5:30
धामणगाव बढे: येथील सार्वजनिक गणेश उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मुस्लीम समाजाच्या युवकाची निवड करून गावाने सामाजिक एकतेचा नवा आदर्श घालून दिला. आज सर्वत्र जातीयतेचे विष पेरून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम काही समाजविघातक शक्ती करीत आहे. अनेक वर्षांपासून गुण्या-गोविंदाने राहणारे समाज आज एकमेकांकडे संशयाने पाहतात. त्याला मात्र धामणगाव बढे अपवाद आहे.
नविन मोदे
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव बढे: येथील सार्वजनिक गणेश उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मुस्लीम समाजाच्या युवकाची निवड करून गावाने सामाजिक एकतेचा नवा आदर्श घालून दिला.
आज सर्वत्र जातीयतेचे विष पेरून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम काही समाजविघातक शक्ती करीत आहे. अनेक वर्षांपासून गुण्या-गोविंदाने राहणारे समाज आज एकमेकांकडे संशयाने पाहतात. त्याला मात्र धामणगाव बढे अपवाद आहे.
येथे गेल्या ८ ते १0 वर्षांंपासून ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविली जात आहे. यावर्षी मात्र एक पाऊल पुढे जात येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी येथील उपसरपंच शेख अफसर मो. शफी यांची निवड करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला.
गावकर्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि नवा आदर्श गावाने घालून दिला. ठाणेदार दीपक वळवी यांना याची माहिती मिळताच त्यांनीसुद्धा या निर्णयाचे स्वागत केले. जिल्हा उपविभागीय अधिकारी महामुनी, अप्पर जि.पो. अधीक्षक डोईफोडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विशेष म्हणजे धामणगाव बढे येथे मुस्लीम समाजाचा ईद मिलान कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून हनुमान मंदिरात पार पडतो. तर येथे दोन मंदीर व मशीद अवघ्या ५0 फूट अंतरावर समोरासमोर आहेत. हिंदू-मुस्लीम जनता एकमेकांच्या सणामध्ये उत्साहात सामील होतात. येथे कधीही कुणाला कीर्तनाचा, आरतीचा व अजानचा त्रास झालेला नाही. त्यामुळे धामणगाव बढेची सामाजिक एकता संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आहे.
धामणगाव बढेचा उपक्रम जिह्यातील एकमेव आहे. येथील सामाजिक एकतेने दिलेला संदेश प्रेरणादायी आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळते.
- संदीप डोईफोडे, अप्पर जि.पो. अधीक्षक, बुलडाणा.