किनगाव जट्टूचा हरभरा पोहोचला पंजाबमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:40 AM2021-03-01T04:40:17+5:302021-03-01T04:40:17+5:30
उत्पादन वाढीकरिता दिवसेंदिवस जमिनीत रासायनिक खताचा अतिरेक होत आहे. कित्येक शेतकरी शेती उत्पादन वाढवण्याकरिता धडपड करीत असताना येथील संदीप ...
उत्पादन वाढीकरिता दिवसेंदिवस जमिनीत रासायनिक खताचा अतिरेक होत आहे. कित्येक शेतकरी शेती उत्पादन वाढवण्याकरिता धडपड करीत असताना येथील संदीप दत्तात्रय मोहरील हा युवा शेतकरी बुलडाणा अर्बन बँकेत कार्यरत असून शेतीशी असलेली नाळ त्यांनी कायम ठेवली. या शेतकऱ्याने रासायनिक खताला फाटा देत यावर्षी जैविक शेती करणे सुरु केले आहे. यामुळे शेती उत्पादनाकरिता खर्च कमी लागून जमिनीची पोत सुधारत असून उत्पादनसुद्धा चांगल्या प्रकारे वाढवता येते. त्यांनी रब्बी हंगामाची सुद्धा गहू, हरभरा जैविक खत औषधे वापरली. हरभरा जैविक असल्याची महिती फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल केली. दरम्यान, रासायनिक खतापेक्षा जैविक खताचा माल आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगला असल्याने पंजाबमधील रेशीम पवार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी फोनद्वारे मोहरील यांच्याशी संपर्क साधला. किनगाव जट्टू परिसरात व्यवसायानिमित्त आलेल्या पंजाबमधील एका व्यक्तीच्या हस्ते डाळीकरिता हरभरा बोलावला होता, दोन दिवसापूर्वी घेऊन गेले असे संदीप मोहरील या शेतकऱ्याने लोकमतशी बोलताना सांगितले.