गुन्हेगारांच्या विचारांत बदल घडण्यासाठी सर्व कारागृहांत होणार कीर्तनाचा गजर
By ब्रह्मानंद जाधव | Published: July 15, 2023 07:41 PM2023-07-15T19:41:56+5:302023-07-15T19:42:18+5:30
मेहकरच्या श्वासानंदपीठाचा आशीर्वाद घेऊन शुभारंभ
ब्रह्मानंद जाधव, मेहकर - बुलढाणा: गुन्हेगारांच्या विचारांत बदल घडण्यासाठी त्यांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. त्यासाठी वारकरी आचारसंहिता परिषदेचे प्रवर्तक नीलेश महाराज झरेगावकर हे राज्यातल्या सर्व कारागृहात कीर्तनाचा गजर घडवणार आहेत. १५ जुलै रोजी मेहकर येथील नरसिंह संस्थानमध्ये येऊन श्वासानंद गुरुपीठाचा आशीर्वाद घेऊन त्यांनी या उपक्रमाच्या शुभारंभासाठी प्रस्थान ठेवले.
राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृहे, ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुले कारागृहे आणि एक महिला कारागृह अशी एकूण ६० कारागृहे आहेत. या सर्व कारागृहांची क्षमता २५ हजार कैद्यांची असताना त्यात ४१ हजार कैदी ठेवण्यात आले आहेत. केवळ दंड देण्यामुळे ही संख्या घटणार नाही, तर विचारांत बदल झाल्यामुळेच ही संख्या घटेल. त्यासाठी त्यांचे प्रबोधन आवश्यक आहे, या विचारातून झरेगावकर महाराजांनी ही संकल्पना मांडली. त्याला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद लाभल्याने नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात १७ जुलै रोजी या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. त्यापूर्वी गुरुपीठाचा आशीर्वाद घेण्यासाठी ते ज्ञानमंदिरात आले होते. प्रारंभी नरसिंह संस्थानचे विश्वस्त आशिष उमाळकर यांनी त्यांचा सत्कार केला. पीठाधीश सद्गुरु ॲड. रंगनाथ महाराज पितळे यांनी पीठस्थ देवतेच्या वतीने आशीर्वाद दिला. पितळे महाराज हे विदर्भातले जुने फडकरी आहेत. त्यामुळे उपक्रमाचा शुभारंभ करण्यापूर्वी पीठस्थ देवता नृसिंह आणि संत बाळाभाऊ महाराजांचा आशीर्वाद घ्यावा म्हणून ज्ञानमंदिरात आलो असल्याची भावना झरेगावकर महाराजांनी व्यक्त केली. याप्रसंगी संस्थानचे विश्वस्त डॉ. अभय कोठारी, गोपाल महाराज पितळे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.