कोरानामुळे गुळवेल वनस्पतीची मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:43 AM2021-04-30T04:43:39+5:302021-04-30T04:43:39+5:30
मासरूळ : बुलडाणा तालुक्यात सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागासह शहरातही गुळवेल, अमृतवेल या वनस्पतींला ...
मासरूळ : बुलडाणा तालुक्यात सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागासह शहरातही गुळवेल, अमृतवेल या वनस्पतींला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. गुळवेल ही वनस्पती शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करीत असल्यामुळे या वनस्पतीची सध्या चांगलीच मागणी आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अनेक कुटुंबांनी गुळवेलचा काढा घेण्याला पसंती दिली आहे. अनेक आजारांवर ही वेल अमृतवेल ठरत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
गुळवेलीचा काढा सेवन केल्याने ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, मळमळ, मूळव्याध, सांधेदुखी, आम्लपित्त, पोटदुखी, मधुमेह आटोक्यात येतो असे सांगितले जाते. त्याप्रमाणे डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाइन फ्लू या आजारावरही गुळवेल गुणकारी असल्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील असंख्य कुटुंबांकडून त्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागात कडुनिंबाच्या झाडावर व आंब्याच्या झाडावर गुळवेल ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. कडुनिंबाच्या झाडावरील गुळवेलीला मोठी मागणी आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून अनेक कुटुंबे गुळवेल काढ्याचे सेवन करीत आहेत. काही जण या वेलीचे छोटे छोटे तुकडे करून रात्री पाण्यात भिजत ठेवतात. सकाळी उपाशीपोटी या पाण्याचे सेवन करतात तर काही कुटुंबे या वेलीची तुकडे पाण्यात टाकून ते पाणी उकळून पितात. गुळवेल हा एक रानभाजीचा प्रकारही मानला जातो.
गुळवेलीचे फायदे अनेक आहेत. प्रतिकारशक्ती वाढते, रक्तदाब कमी होतो, मलेरिया, टायफाईड आजारावर फायदेशीर आहे. पोटाच्या समस्या दूर होतात. मधुमेहावर गुणकारी असून, दमा, खोकला आणि कफ कमी होतो. लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते.
-नामदेव भागवत सिनकर महाराज, मासरूळ