Shravan Special : सकाळी व सायंकाळी सुर्यकिरणे शिवलिंगावर पडणारी कोथडीची मंदिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 10:55 AM2021-08-09T10:55:24+5:302021-08-09T10:55:30+5:30
Shravan Special : मोताळा तालुक्यातील कोथडी येथे दोन दगडी बांधकाम असलेली महादेवाची मंदिरे आहेत.
- विवेक चांदूरकर
खामगाव : मोताळा तालुक्यातील कोथडी येथे दोन दगडी बांधकाम असलेली महादेवाची मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये सकाळी व सायंकाळी सुर्यकिरणे शिवलिंगावर पडतात. या मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होते.
कोथडी गावात महादेवाची दोन मंदिरे आहेत. दोन्ही मंदिरांचे प्रवेशव्दार विरूद्ध दिशेने आहे. एक मंदिर गावामध्ये असून, दुसरे गावाबाहेर आहे. गावाबाहेर चिंतामणी मंदिर असून, या मंदिराचे बांधकाम पूर्णता दगडामध्ये केले आहे. या मंदिरात सायंकाळी सुर्य मावळताना सुर्यकिरणे शिवलिंगावर पडतात. या मंदिराचे छत पडल्याने नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. मंदिरातील दगडी खांबावर विविध नक्षी कोरली आहे. तसेच गावात एक महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर सुंदर मूर्ती, शिल्प व नक्षीकलेने संपन्न आहे. या मंदिराचे बांधकाम सुद्धा दगडांमध्ये करण्यात आले आहे. मंदिराच्या समोर दगडांपासून बांधकाम केलेला ओटा आहे. मंदिराच्या चहुबाजुने यक्षाचे शिल्प कोरले आहे. हे यक्ष मंदिराच्या भार आपल्या खांद्यावर घेवून आहेत. तसेच चहुबाजुने दगडावर सुरेख नक्षी कोरली आहे. मंदिराच्या आतमध्ये मुख्य गाभाºयासह दोन उपमंदिरेही आहेत. मुख्य गाभाºयात शिवलिंग आहे. सकाळी सुर्य उगवताना शिवलिंगावर सुर्यकिरणे पडतात. मंदिराच्या प्रवेश्वदारावर बारीक मूर्ती व शिल्प कोरण्यात आले आहे. येथे विष्णू व सुरसुंदरींचे शिल्प आहे. हे प्रवेशव्दार बघून प्राचीन मूर्तीकार किती निपूण होते व मूर्तीकला किती विकसित होती, याचा प्रत्यय येतो. तसेच गाभाºयाच्या प्रवेशव्दारावरही अप्रतिम मूर्ती व शिल्प कोरले आहे. या मूर्ती व शिल्पांमधून हिंदू संस्कृतीच तेथे साकारण्यात आली आहे. विविध प्रसंग मूर्तीरूपाने दाखविण्यात आले आहे. मंदिराचे छत आतून कोरीव आहे. छतावर सुद्धा सुंदर नक्षी कोरली आहे. मंदिराच्या समोर काही खांब अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आहेत. येथे आधी सभामंडप असायला हवा. मंदिराच्या चहुबाजुने असलेल्या दगडांवर बारीक नक्षीकाम केले आहे.
या मंदिरांचे बांधकाम बाराव्या शतकात झाले असावे, असा अंदाज आहे. बाराव्या शतकात देवगिरीचे (सध्याचे दौलताबाद) राजे रामदेवराव व कृष्णदेवराव यादव यांच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात अनेक मंदिरांचे बांधकाम करण्यात आले. यादव काळात बांधण्यात आलेल्या मंदिरात हेमाडपंथी मंदिरेही म्हणतात. या काळात मंदिर बांधकामाची नवीन शैली विकसित झाली होती. तसेच त्यांच्या काळात सर्वत्र समृद्धता नांदत असल्याने अनेक मंदिरांचे बांधकाम करण्यात आले. यादव शैव पंथीय असल्यामुळे त्यांनी महादेवाची मंदिरे बांधली. ही दोन्ही मंदिरे बघायला अनेक पर्यटक व अभ्यासक येतात. तसेच श्रावण महिन्यात मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते.