तहसीलदारांच्या निवासस्थानात कोतवालाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 11:41 AM2021-06-28T11:41:33+5:302021-06-28T11:41:40+5:30
Kotwal commits suicide at tehsildar's residence : मृताच्या खिशामध्ये पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली असून त्यात तीन जणांची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : येथील तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानामध्ये एका कोतवालाने आत्महत्या केल्याची घटना २७ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, मृताच्या खिशामध्ये पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली असून त्यात तीन जणांची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मात्र तपासाच्या दृष्टीने काही बाबी पोलिसांनी उघड केल्या नाहीत.
मोताळा तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानामध्ये कोणी हजर नसताना या निवासस्थानासोबतच कार्यालयाची देखभाल करणाऱ्या कोतवालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तहसीलदार रविवार असल्याने बाहेरगावी गेले होते. त्यामुळे निवासस्थानी कोणीही नव्हते. विष्णू शंकर सुरपाटणे (४४) असे मृत कोतवालाचे नाव आहे. त्याने नेमक्या कोणत्या कारणावरून आत्महत्या केली ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
विष्णू सुरपाटणे यांचा फोन लागत नसल्याने त्यांच्या मुलांनी तहसील कार्यालयासह परिसरात त्यांचा शोध घेतला असता तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानी पंख्याला गळफास घेऊन विष्णू सुरपाटणे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच बोराखेडीचे ठाणेदार माधवराव गरुड व त्यांचे सहकारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
घटनेचा पुढील तपास साहाय्यक ठाणेदार राहुल जंजाळ करीत आहेत. मृत व्यक्तीच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये तीन व्यक्तींची नावे असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
घटनास्थळाचा पंचनामा करून बोराखेडी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.