लोणार येथील कोविड सेंटर हाऊसफुल्ल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:31 AM2021-04-19T04:31:26+5:302021-04-19T04:31:26+5:30
लोणार : तालुक्यातील एकमेव असलेल्या लोणी रोड स्थित कोविड केअर सेंटर सध्या कोरोना रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाले आहे. ...
लोणार : तालुक्यातील एकमेव असलेल्या लोणी रोड स्थित कोविड केअर सेंटर सध्या कोरोना रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाले आहे. या केंद्राची क्षमता ५० ते ६० रुग्णांची आहे. परंतु या केंद्रात सध्या १०० च्या जवळपास रुग्ण दाखल आहेत.
कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. गेल्या दोन दिवसांत येथे कार्यरत चारपैकी दोन डॉक्टर कोरोनाग्रस्त झाले आहेत. तर एकाला कोरोनासदृश लक्षणे दिसत असल्याने त्यांनी दिलेल्या नमुन्याचा अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे येथे सध्या केवळ दोन वैद्यकीय अधिकारी आणि रुग्ण मात्र १०० अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच येथे मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्यांचे नमुने घेण्याचे काम २४ तास सुरू असते, तोसुध्दा अतिरिक्त ताण येथे कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आला आहे. त्यातच भरीस भर म्हणून आज एका दिवसातच तालुक्यात १०१ अशा विक्रमी संख्येने कोरोनाग्रस्त आढळल्याने येथे दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अजून वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत सामाजिक न्याय आश्रम वसतिगृहाची शेजारील इमारत प्रशासनाने ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच तेथेसुध्दा विलगिकरण केंद्र सुरू होणार आहे. येथे कार्यरत अधिकारी व कर्मचारी मात्र अपुरे पडत असल्याने कर्तव्य बजावताना त्रस्त झाले आहेत.
अतिरिक्त कामाचा ताण
आतापर्यंत या कोविड सेंटरवर अतिशय उत्तम सोयीसुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच येथे उपचार घेतल्यानंतर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्यासुध्दा मोठी आहे. परंतु आता आवाक्याबाहेर वाढणारी रुग्णसंख्या बघता इथून पुढे येथील व्यवस्थापनासाठी कसोटीचा काळ राहणार असल्याचे चित्र आहे. त्यातच या केंद्रावर बरेच वृद्ध रुग्ण दाखल होत असल्याने व त्यांची देखभाल करण्यासाठी कोणीही कुटुबातील सदस्य नसल्याने त्यांच्यावर अतिरिक्त लक्ष येथील डॉक्टर व परिचारकांना द्यावे लागत आहे.
बेडसाठी संषर्घ
सध्या जिल्ह्यातील सर्वच कोविड समर्पित रुग्णालय भरले असल्याने एखाद्या अत्यवस्थ रुग्णाला भरती करण्यासाठी बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णावर उपचार करण्यासाठी सीमित संसाधने असल्याने अशा रुग्णांना वाचवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो.