खामगाव रुग्णालयातही कोविड लॅब कार्यान्वित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 11:17 AM2021-05-12T11:17:13+5:302021-05-12T11:17:21+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा डबलिंग रेट ३५ दिवसांवर आणि पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्क्यांवर असतानाच बुलडाण्यातील कोविड लॅबवर निर्माण झालेला ...
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा डबलिंग रेट ३५ दिवसांवर आणि पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्क्यांवर असतानाच बुलडाण्यातील कोविड लॅबवर निर्माण झालेला ताण येत्या आठ ते दहा दिवसांत कमी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. खामगाव येथील जिल्हा रुग्णालयातही आता कोविड लॅब उभारण्यात येत असून, या महिना अखेरीस ती कार्यान्वित होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केल आहे. त्यामुळे घाटाखालील मलकापूर, जळगाव जामोद, नांदुरा, खामगाव, संग्रामपूर आणि शेगाव या सहा तालुक्यांतील कोरोनाच्या चाचण्या खामगावातील जिल्हा रुग्णालयात होण्यास मदत होणार आहे. सोबतच कोरोना चाचणीचे अहवाल विलंबाने मिळत असल्याच्या संदिग्धांच्या तक्रारीचे प्रमाण त्यामुळे येत्या काळात कमी होईल. क्षेत्रफळाच्या दृष्टीने नगर, यवतमाळ जिल्ह्यानंतर बुलडाणा जिल्ह्याचा नंबर लागतो. भौगोलिक परिस्थितीमुळे संदिग्धांचे स्वॅब बुलडाणा येथील कोविड लॅबमध्ये पोहोचण्यास विलंब होत होता. दररोज जवळपास सात हजारांपेक्षा अधिक स्वॅब हे बुलडाणा कोविड लॅबमध्ये येत होते. त्यामुळे या लॅबवर मोठा ताण आला होता. तुलनेने मनुष्यबळही कमी होते. परिणामी बुलडाणा जिल्ह्यात एका नवीन कोविड लॅबची गरज होती. ती अखेर मान्य झाली आहे. खामगावातील कोविड लॅब संदर्भातील फाइल अंतिम टप्प्यात आहे.