सिंदखेड राजातही कोविड लसीकरणाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:04 AM2021-02-06T05:04:49+5:302021-02-06T05:04:49+5:30
सिंदखेड राजा : येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरणाला सुरुवात झाली असून, ४ फेब्रुवारी रोजी कोरोना काळात पहिल्या फळीत ...
सिंदखेड राजा : येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरणाला सुरुवात झाली असून, ४ फेब्रुवारी रोजी कोरोना काळात पहिल्या फळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. यावेळी नगराध्याक्ष सतीश तायडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत दळवी, तहसीलदार सुनील सावंत, डॉ. सुनीता बिराजदार, सामाजिक कार्यकर्ते भगवान सातपुते उपस्थित होते.
दरम्यान, कोविशिल्ड ही लस अत्यंत सुरक्षित असून, लस घेताना घाबरु नये, असे आवाहन डॉ. सुनीता बिराजदार यांनी केले. ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक असलेल्या बिराजदार यांनी पहिली लस टोचून घेतली. या लसीचे पाचशे डोस येथे उपलब्ध आहेत. पहिल्या टप्प्यात रुग्णालयाचे कर्मचारी, डॉक्टर, सफाई कामगार यांचा समावेश असणार आहे तर लगेच दोन दिवसानंतर पाचशे डोस मागविणार असल्याचे बिराजदार यांनी यावेळी सांगितले. ही लस प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रपणे त्याच्या मोबाईलवर मॅसेज आल्यानंतर देण्यात येणार आहे. निर्धारित ठिकाण व कालावधीमध्ये ही लस दिली जाईल. लस घेण्यासाठी येणाऱ्यांनी जेवण करूनच यावे. आपल्यासोबत एक अेाळखपत्रही आणावे, असे आवाहन केले. लस घेतल्यानंतर संबंधितांना काही काळ निरीक्षणाखालीही ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना सुटी देण्यात येईल. दरम्यान, सुटी झाल्यानंतरही थोडी अंगदुखी, डोकेदुखी किंवा ताप जाणवू शकतो. त्यामुळे घाबरून न जाता आपल्या जवळील अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेविकांशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. बिराजदार यांनी केले.
जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही लस देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.