कृउबास देणार नाफेडला बारदाना!
By Admin | Published: March 30, 2017 02:29 AM2017-03-30T02:29:16+5:302017-03-30T02:29:16+5:30
खामगाव येथील हमीभाव केंद्रावर महिन्याभरापासून तुरीची आवक बंद
खामगाव, दि. २९- तुरीला हमीभाव मिळावा, यासाठी येथे सुरू असलेल्या नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर बारदाना नसल्याने गेल्या २६ फेब्रुवारीपासून तुरीची आवक स्वीकारणे बंद आहे. यामुळे शेतकर्यांची गैरसोय टाळण्यासाठी नाफेडला मोफत बारदाना पुरविण्याचा ठराव खामगाव कृउबासने बुधवारी झालेल्या संचालकांच्या सभेत घेतला.
शेतमालास हमीभाव मिळावा, यासाठी खामगाव येथील कृउबासच्या टीएमसी यार्डमध्ये तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र, खुल्या बाजारातील तुरीचे भाव हमीदरापेक्षा कमी असल्याने येथील हमीदर तूर खरेदी केंद्रावर मोठय़ा प्रमाणात तुरीची विक्री करण्यात आली. दरम्यान, आवक वाढल्याने हमीदराने तूर खरेदी करणार्या विदर्भ मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशनने गत २७ फेब्रुवारीपासून तुरीची आवक स्वीकारणे बंद केले आहे. खुल्या बाजारात अद्याप तुरीचे भाव हमीदरापेक्षा कमीच आहेत, तर नाफेडने तूर स्वीकारणे बंद केले आहे. त्यामुळे घरात पडून असलेली तूर हमीदराने खरेदी होईल की नाही, असा संभ्रम शेतकर्यांना पडला आहे. दरम्यान, आवक स्वीकारणे सुरू करावे तसेच मोजमापाची गती वाढविण्यात यावी, यासाठी भाराकाँच्यावतीने माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात आंदोलनदेखील करण्यात आले होते. याच दिवशी विदर्भ माकेर्ंटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशनने बारदाना मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने तुरीची आवक थांबविण्याबाबत कृउबासला लेखी पत्र दिले होते.
यामुळे बारदानाअभावी शेतकर्यांची गैरसोय होत असेल, तर नाफेडला मोफत बारदाना उपलब्ध करुन देण्याचा ठराव कृउबास संचालकांच्या बुधवारी झालेल्या तातडीच्या सभेत घेण्यात आला. या सभेला कृउबास सभापती संतोष टाले, उपसभापती नीलेश दिपके, संचालक श्रीकृष्ण धोटे, श्रीकृष्ण टिकार, प्रमोद चिंचोलकार, विलाससिंग इंगळे, संजय झुनझुनवाला, राजेश हेलोडे, विमलबाई वाकुडकार, सुलोचना राऊत, संतोष देशमुख, ज्ञानेश्वर सुडोकार, दिलीप पाटील, अशोक हटकर, किशोर बोबडे आदींची उपस्थिती होती.