शेतक-यांच्या स्वागतासाठी खामगांव नगरी सज्ज, कृषी महोत्सवाची तयारी पुर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 01:30 PM2018-02-15T13:30:27+5:302018-02-15T13:30:46+5:30
पश्चिम विदर्भात पहिल्यांदाच होणा-या भव्य कृषी महोत्सवाची तयारी पुर्ण झाली असून शेतक-यांच्या स्वागतासाठी खामगांव नगरी सज्ज झाली आहे
खामगांव : पश्चिम विदर्भात पहिल्यांदाच होणा-या भव्य कृषी महोत्सवाची तयारी पुर्ण झाली असून शेतक-यांच्या स्वागतासाठी खामगांव नगरी सज्ज झाली आहे. १६ फेब्रुवारी पासून महोत्सवाला सुरुवात होत आहे. महोत्सवाच्या उदघाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस खामगांवात येत आहेत. खामगांवाच्या इतिहासात प्रथमच भव्य कृषी महोत्सवाचे आयोजन होत आहे. राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांचे प्रयत्नातून बुलढाणा सह पश्चिम विदभार्तील जिल्हयातील शेतक-यांच्या हितासाठी व मार्गदर्शनासाठी कृषी महोत्सवाचे माध्यमातून शेतक-यांना सुवर्ण संधी चालून आली आहे. शुक्रवार १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी पर्यंत जलंब रोडवरील पॉलीटेक्नीक कॉलेजच्या भव्य मैदानावर सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजता पर्यंत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या प्रारंभ व प्रचार प्रसारासाठी शुक्रवारी सकाळी ११.०० वा डॉ बाबासाहेब आंबेडकर न.प.मैदान येथून भव्य ट्रॅक्टर व बैलगाडी दिंडी निघणार आहे. खामगांव मतदार संघाचे युवा आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात निघणा-या या दिंडीला राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री हिरवी झेंडी दाखवणार असून नंतर ही दिंडी खामगांव शहरातील प्रमुख मागार्ने मार्गक्रमण करुन समारोप कृषी महोत्सव स्थळी होणार आहे.
मुख्यमंत्री शनिवारी खामगावात
या महोत्सवाच्या उदघाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस शनिवारी सकाळी १०.३० वा येत आहेत. यावेळी राज्याचे कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांचेसह भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ.चैनसुख संचेती, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.डॉ संजय कुटे, अॅड. आकाश फुंडकर यांचेसह आमदार, खासदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कृषी महोत्सवाचे आकर्षण
या कृषी महोत्सवात ४०० हून अधिक स्टॉल आहेत. यामध्ये शेती विषयी माहिती, तंत्रज्ञान, बिबियाणे, सेंद्रीय शेती, सौर शेती कुंपण, शेती उत्पादने, शेती प्रक्रीया उद्योग, पशुपालन, यासह अत्याधुनिक शेतीची प्रात्यक्षिके दाखविणारे स्टॉल राहणार आहेत. शासनाच्या योजनांची माहिती याठिकाणी देण्यात येणार आहे. या कृषि महोत्सवास शेतकरी बांधवानी मोठया प्रमाणात भेट देऊन आपल्या शेतीचे उत्पादन दुप्पट करण्याचे दृष्टीने नवीन तंत्रज्ञान व शेती पुरक व्यवसाय करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी व फलोत्पादन मंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांनी केले आहे.