अनाथ, निराधारांचा आधार व्हायचंय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 07:45 PM2021-08-02T19:45:26+5:302021-08-02T19:45:38+5:30
Khamgaon : निराधारांची सेवा करायची, असा संकल्प इंदोर येथील सूर्योदय परिवाराच्या कुहूदीदी भय्युजी देशमुख यांनी "लोकमत"शी बोलताना व्यक्त केला.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: समाजातील अनेकांसाठी आधारवड असलेले वडिल राष्ट्रसंत भय्यूजी महाराज अनपेक्षीत गेले. तत्पूर्वीच क्रुर नियतीने आईचे (माधवी उदयसिंह देशमुख) प्राणपाखरू हेरले. लागलीचच आजीचाही मृत्यू झाला. संकटं एकापाठोपाठ एक अशी आयुष्यात आली. यापुढे वंचित आणि निराधारांची सेवा करायची, असा संकल्प इंदोर येथील सूर्योदय परिवाराच्या कुहूदीदी भय्युजी देशमुख यांनी "लोकमत"शी बोलताना व्यक्त केला.
आईच्या मृत्यूचे दु:ख पचविण्याचे बळ अंगात येत असतानाच वडिलांच्या अनपेक्षित जाण्याच्या आघाताने डोक्यावरील आभाळ आणि पाया खालची जमिन सरकली. राष्ट्रसंतांची लाडकी एकापाठोपाठ अशा तीन धक्क्यांनी खचली. दोन्ही पखांनी उणी झाली. स्वत:च अनाथ आणि निराधारही झाली आहे. ही वस्तुस्थिती आणि सत्य कुणीही नाकारू शकत नाही.
- उपेक्षीत, वंचित, निराधार आणि अनाथांचे उध्दारकर्ते राष्ट्रसंत भय्युजी महाराज आपले वडिल होते... अनेकांचा आधारवड असलेल्या आई-वडिलांचेच रक्त माझ्या धमण्यांमधून वाहतंय. हीच परमात्माची कृपादृष्टी मानत, राष्ट्रसंत वडिल भय्यूजी आणि सेवातपस्वी आई माधवीचे अपूर्ण राहीलेलं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालणार आहे.
- ईश्वरी शक्तीला साक्षी ठेवून गुरूदेवांचे आशीर्वादाने यापुढील आयुष्य निराधार आणि वंचितांच्या सेवेसाठी झोकून देणे हाच आपला प्रथम आणि अंतिम आपला संकल्प राहील.
गुरूदेवांचं जाणं हाच मोठा धक्का!
- मायेचा आधार असलेली आई गेल्यानंतर काही दिवसांतच गुरूदेव आणि वडिल असलेले भय्यूजी महाराज अनपेक्षीत गेले. हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का आहे. या धक्क्यातून न डगमगता स्वत:ला सावरलं. नियती आणि आप्तांनी अव्हरलेल्या कुहू गत काही दिवसांत अनेक चटके सहन केले आणि म्हणूनच निराधार, वंचित आणि उपेक्षितांसाठी आधार होण्यासाठी कुहू आता सज्ज झाली आहे. यापुढील कोणताही धक्का आता आपल्यासाठी मोठा असूच शकत नाही.