व्याजाच्या पैशाला कंटाळून प्रयोगशाळा परिचराची आत्महत्या; आठ जणांविरुद्ध गुन्हा
By विवेक चांदुरकर | Published: June 19, 2024 01:39 PM2024-06-19T13:39:48+5:302024-06-19T15:00:05+5:30
वृंदावन नगर येथील रहिवासी चैनसिंग अमरसिंह चव्हाण (वय ५५) लि.भो.चांडक विद्यालयात प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत होते.
मलकापूर: व्याजाच्या पैशाला कंटाळून येथील लि.भो.चांडक विद्यालयातील प्रयोगशाळा परिचराने आत्महत्या केली. विष प्राषनानंतर पाचव्या दिवशी १९ जून रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
वृंदावन नगर येथील रहिवासी चैनसिंग अमरसिंह चव्हाण (वय ५५) लि.भो.चांडक विद्यालयात प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत होते. त्यांनी १३ जून रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी त्यांचा मुलगा सचिन चैनसिंग चव्हाण यांनी १८ जून रोजी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली.
त्यात नमूद केले की, चैनसिंग चव्हाण यांना रामेश्वर पाटील यांनी ३ हजार रुपये व्याजाने दिले होते. त्या पैशांवरील व्याजाच्या पैशांसाठी घरी येऊन, फोनवरून व समक्ष धमक्या देत पैशाची मागणी करीत होते. चैनसिंग चव्हाण यांना ते चांडक विद्यालयात जावून जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. तसेच माझे सुद्धा चारचाकी वाहन अडवून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने धमक्या दिल्या व आत्महत्येस प्रवृत्त केले.
या प्रकरणी पोलिसांनी सचिन चैनसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रामेश्वर पाटील, राहुल पाटील, संतोष पाटील, स्वप्निल भगत व आणखी ८ जणांविरुद्ध कलम ३०६, ३४१, ५०४, ५०६, ३४ भा.द.वी.सहकलम ३(१),(१),३(१),(s) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. व्याजाच्या पैशावरुन आत्महत्येस प्रवृत्त करणे व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याने या प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी देवराम गवळी घटनेचा तपास करीत आहेत.