पैनगंगा नदीमध्ये मजुरांची नाव उलटली, एका महिलेचा मृत्यू सहा महिला सुदैवाने बचावल्या
By संदीप वानखेडे | Published: March 19, 2023 06:40 PM2023-03-19T18:40:53+5:302023-03-19T18:41:04+5:30
नदीच्या पाण्यात बुडत असलेल्या सहा महिलांना जीवन राऊत यांनी वाचविले; परंतु सरलाबाई रामभाऊ राऊत ही महिला नदीच्या पाण्यात बुडाली हाेती.
मेहकर (बुलढाणा) : पैनगंगा नदीपात्रातून शेतात जात असलेल्या मजुरांची नाव उलटल्याने एक महिला बुडाली तर सहा महिला सुदैवाने बचावल्या. ही घटना मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथे १८ मार्च राेजी सायंकाळी घडली. दरम्यान, बुडालेल्या महिलेचा मृतदेह १९ मार्च राेजी आढळला. सरलाबाई रामभाऊ राऊत (वय ४५) असे मृतक महिलेचे नाव आहे.
अंत्री देशमुख येथील पैनगंगा नदीच्या काठावर जमीन असलेले शेतकरी व शेतमजुरी शेतात जाण्यासाठी लाेखंडी नावेचा गेल्या २० ते २५ वर्षांपासून वापर करतात. १८ मार्च राेजी गावातील काही शेतकरी व महिला शेतातून परत येत असताना नावेत जास्त वजन झाल्याने ते हेलखावे खात हाेती. त्यामुळे घाबरलेल्या महिलांनी नदीत उड्या घेतली. यावेळी नदीच्या पाण्यात बुडत असलेल्या सहा महिलांना जीवन राऊत यांनी वाचविले; परंतु सरलाबाई रामभाऊ राऊत ही महिला नदीच्या पाण्यात बुडाली हाेती.
नेमके त्याच वेळी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने सरपंच ज्ञानेश्वर देशमुख, उपसरपंच अंकुश देशमुख, सदस्य जीवन देशमुख, बाळू देशमुख, विकास मोरे, रवी मोरे, वसंत आखरे, अनिल आखाडे, कैलास देशमुख, गुणवंत देशमुख, हरिश्चंद्र देशमुख ,पवन देशमुख ,गजानन आखाडे ,संतोष जाधव ,सुनील देशमुख, लक्ष्मण पुरी, दत्ता पुरी यांनी नदीपात्रात उतरून बुडालेल्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नदीपात्रात कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे पाणी पातळी खोलवर असल्याने त्यांना त्या महिलेला शोधण्यात यश आले नाही. दुसऱ्या दिवशी सरलाबाई राऊत यांचा मृतदेह आढळला.