लाचखाेर कनिष्ठ अभियंता गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:32 AM2021-03-24T04:32:53+5:302021-03-24T04:32:53+5:30
सिंदखेडराजा : शाळा खाेल्यांच्या बांधकामाचे देयक काढण्यासाठी कंत्राटदाराला लाच मागणाऱ्या सिंदखेड राजा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या कनिष्ठ ...
सिंदखेडराजा : शाळा खाेल्यांच्या बांधकामाचे देयक काढण्यासाठी कंत्राटदाराला लाच मागणाऱ्या सिंदखेड राजा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले. संदीप सुरेश उबाळे असे अटक केलेल्या अभियंत्याचे नाव आहे.
दुसरबीड येथील एका बांधकाम कंत्राटदाराने २०२० मध्ये सिंदखेड राजा पंचायत समितीअंतर्गत ग्राम वाकद, राहेरी व आडगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोलीचे बांधकाम केले आहे. या बांधकामाचे बिल एकूण २५ लाख २६ हजार रुपये झाले आहे. हे बिल मंजूर करण्यासाठी उबाळे याने तीन टक्केप्रमाणे ७० हजार रुपयांची मागणी कंत्राटदाराला केली. कंत्राटदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचून पंचायत समितीच्या आवारात ४० हजार रुपयांची लाख घेताना संदीप उबाळे यास रंगेहात अटक केली. ही कारवाई पो. उपअधीक्षक आर. एन. मळघणे, पोलीस नाईक विलास साखरे, रवींद्र दळवी,
जगदीश पवार यांच्या पथकाने केली. याप्रकरणी आराेपी अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.