ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव
By Admin | Published: May 15, 2017 12:06 AM2017-05-15T00:06:42+5:302017-05-15T00:06:42+5:30
आर्थिक भुर्दंड : रुग्णांना करावा लागतो महागडा उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : येथील ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव असून, रुग्णांलयाच्या नियोजनशून्य कारभारामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार होत नसल्याने गरीब रुग्णांना खासगी दवाखान्यात महागडा उपचार घ्यावा लागत आहे. रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विलास आखाडे व कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली आहे.
यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आ. संजय रायमुलकर, समाधान साबळे आदींची उपस्थित होती. येथील ग्रामीण रुग्णालयात नेहमीच नियोजनाचा अभाव असतो. या रुग्णालयात शहरातून व ग्रामीण भागातून दररोज गोरगरीब रुग्ण येत असतात; परंतु रुग्णालयात कायमस्वरूपी एम.एस. सर्जन, आॅर्थोपेडिक, एक्स-रे टेक्निशियन, सोनोग्राफी मशीन यांचा अभाव आहे. त्यामुळे गरीब रुग्णांवर उपचार होत नसल्याने कित्येक गरिबांना नाइलाजास्तव आर्थिक परिस्थिती नसतानासुद्धा खासगी रुग्णालयात उपचार करावा लागतो. त्यामुळे रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विलास आखाडे, प्रशांत सौभागे, मारोती जुनघरे, सुनील माळवे, संदीप सास्ते, रमेश गायकवाड, राम सौभागे यांच्यासह आदींनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली आहे.