कृषी उत्पन्न बाजार समितीत मुलभूत सुविधांचा अभाव; हमाल, मापार्यांचे लाक्षणिक आंदोलन
By अनिल गवई | Published: November 1, 2023 03:09 PM2023-11-01T15:09:26+5:302023-11-01T15:11:08+5:30
कृउबास सभापती आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर धान्यखरेदीला पूर्ववत सुरूवात करण्यात आली.
खामगाव: स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुलभूत सुविधांअभावी हमाल, मापारी आणि अडत्यांनी बुधवारी दुपारी धान्य खरेदी बंद करीत समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कृउबास सभापती आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर धान्यखरेदीला पूर्ववत सुरूवात करण्यात आली. या प्रकारामुळे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रस्त्यांचा अभाव आहे. धान्याचे शेड उंच असल्यामुळे हमाल आणि मापार्यांना त्रास सहन करावा लागतो. धान्याचे ट्रक आणि वाहने रस्त्याने जात असताना धूळ आणि गिट्टी उडून हमाल जखमी होतात. यासह विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक हमाल, अडते आणि व्यापार्यांनी बुधवारी दुपारी १२ वाजता दरम्यान, धान्य खरेदी बंद पाडली होती. या प्रकारामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत एकच खळबळ उडाली होती. चर्चेनंतर दुपारपासून धान्य खरेदीला सुरूवात करण्यात आली.
राजकीय विरोधातून कृषीण उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या विकास कामासोबतच इतरही कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुलभूत सुविधांचे काम रखडले आहे. याप्रकरणी न्यायालयीन स्तरावरून लढा सुरू आहे. लवकरच ही विकासकामे तडीस नेली जातील.
सुभाष पेसोडे, सभापती, कृउबास, खामगाव.
काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित आणि मित्र पक्षाने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत यश संपादन केले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्यांसाठी ही चपराक आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून राजकीय कुरघोडीतून विकास कामांना अडथळा िनर्माण केल्या जात आहे. लवकरच यावर तोडगा निघेल.
िदलीपकुमार सांनदा, माजी आमदार
कृषी उत्पन्न बाजार समितीत मुलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे शेतकरी आणि हमाल, मापार्यांसोबतच व्यापार्यांनाही त्रास होतो. रस्त्या अभावी हमालांना त्रास होतो. याकडे त्वरीत लक्ष न दिल्यास, दिवाळीनंतर कायम स्वरूपी खरेदी बंद करण्याचा निर्धार आहे.
अविनाश सोनट्टके, अडते, कृउबास खामगाव.
राजकारण बाजूला ठेवून हमाल आणि व्यापार्यांना सुविधा उलब्ध करून द्याव्यात. यासाठी विरोधी आणि सत्ताधार्यांनीही एकत्र यावे, समस्यांवर तोडगा काढून, शेतकरी आणि हमालांना न्याय देण्यात यावा. िवकास कामासाठी स्थगितीही उठविली जावी.
नथ्थू मोरे, प्रभारी जिल्हाध्यक्ष, हमाल, मापारी संघटना, खामगाव.