बुलडाणा जिल्हयाच्या चेकपोस्टवर पोलिसांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 10:31 AM2020-05-12T10:31:38+5:302020-05-12T10:31:49+5:30
जिल्ह्याच्या सिमावर्ती भागातील चेकपोस्टला छेद देवून अनेक जणांचा प्रवास अजूनही सुरुच असल्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे.
- योगेश फरपट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: रविवारी बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या शून्य झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले. अन रात्री उशिरा जळगाव जामोद येथे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती मिळाल्याने जिल्हावासियांनी पुन्हा एकदा धसका घेतला आहे. बुलडाणा जिल्हयात व जिल्ह्याच्या सिमावर्ती भागातील चेकपोस्टला छेद देवून अनेक जणांचा प्रवास अजूनही सुरुच असल्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे.
‘लोकमत’ने दोन दिवसापूर्वीच बुलडाणा जिल्ह्यातील सिमेवरील चेकपोस्ट नावापुरत्याच असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते हे विशेष. जिल्ह्याला लागून अकोला, जळगाव, व बºहाणपूर, जालना हे चार जिल्हे लागतात. राज्यात लॉकडाउन सुरु होवून दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. जळगाव खांदेश, बºहाणपूर, जालना व अकोला हे चारही जिल्हे रेडझोन मध्ये असताना या जिल्ह्यातून बुलडाणामार्गे सर्रास नागरिकांची ये-जा सुरु आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या सिमेवर चेकपोस्ट तयार करण्यात येवून त्याठिकाणी तपासणीशिवाय कुणालाही एन्ट्री देण्यात येवू नये असे स्पष्ट निर्देश असताना त्यांच्या आदेशाला मात्र पोलिसांकडून तिलांजली दिली जात असल्याचे दिसून आले. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्हयात जाण्यासाठी अधिकृत परवानगीची अट असताना सर्रासपणे या आदेशाचे उल्लंघन होतांना दिसत आहे. यामुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढल्याचे दिसून येते. आज जळगाव जामोद येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या घटनेने याप्रकारावर शिक्कामोर्तब झाले आहे. अकोला येथे रुग्णालयीन कामानिमित्त, बºहाणपूर, इंदौर, जळगाव खांदेश येथे साहित्य खरेदीसाठी सर्रासपणे आजही नागरिक जातांना दिसत आहेत. विशेष म्हणजे जिल्हयाच्या सिमेवर प्रत्येक ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. पोलिसांची नजर चुकवून रेडझोन मधील जिल्ह्यात ये जा करणे नागरिकांना कशाप्रकारे महागात पडू शकते याचा प्रत्यय आलाच आहे. आतातरी पोलिस प्रशासनाने चेकपोस्टवर काटेकोर तपासणी करण्याची गरज आहे.
चेकपोस्टवरील पोलिसांच्या कर्तव्याबाबत शंका
जळगाव जामोद येथील तिघे अंत्यसंस्कारासाठी बºहाणपूरला गेले अन परत आले, ते कोरोना घेवूनच. तिघांपैकी एकाची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. या घटनेने चेकपोस्टवरील तपासणीबाबत साशंकता निर्माण झाली आहे.