जनजागृतीअभावी पशुसंवर्धन विभागाच्या नाविण्यपूर्ण योजनेचा फज्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 03:24 PM2018-11-29T15:24:36+5:302018-11-29T15:59:35+5:30
राज्यात पशुसंवर्धन विभागाच्या नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत संकरीत गायी, म्हशींचे वाटप, मेंढी वाट, कुक्कूटपालन योजनेसाठी शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू आहे.
खामगाव - राज्यात पशुसंवर्धन विभागाच्या नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत संकरीत गायी, म्हशींचे वाटप, मेंढी वाट, कुक्कूटपालन योजनेसाठी शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता दिशाभूल केली जात असल्याचा प्रकार येथील पंचायत समितीत गुरुवारी सकाळी आढळून आला.
शेतकऱ्यां चे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी सरकारने शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करण्यासाठी तसेच कुक्कूटपालन करण्यासाठी प्रोत्साहीत केले जात आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. मात्र तालुक्यातील शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे दिसून येते. पंचायत समितीतील पशुसंवर्धन विभागाने त्याबाबतची जनजागृती केली नसल्याने शेतकऱ्यांना योजनेची माहिती मिळू शकत नसल्याचे दिसते. लांजूड येथील काही शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीतील पशुसंवर्धन विभागात आले होते. याठिकाणी असलेल्या पशुधन पर्यवेक्षक बी.एन.बोपटे यांनी शेतकऱ्यांना कुठलीही माहिती न देता थेट राठी झेरॉक्सचा रस्ता दाखवला. त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. शेतकऱ्यांनी अखेर गटविकास अधिकारी के.डी.शिंदे यांची भेट घेवून बोपटे यांची तक्रार केली. त्यानंतर शिंदे यांनी बोपटे यांना बोलावून शेतकऱ्यांना माहिती देण्याबाबत आदेश दिले. विशेष म्हणजे पंचायत समितीतील पशुसंवर्धन विभागात योजनेसाठी पात्र शेतकरी, पशुपालक किती याची कोणताही माहिती उपलब्ध आढळून आली नाही.
तालुका पशुसंवर्धन अधिकारी अनुपस्थित!
पशुधन पर्यवेक्षक बी.एन.बोपटे यांच्याकडून समाधान न झाल्याने त्यांनी तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.डी.अवताळे यांची भेट घेण्याचे ठरवले. मात्र तेही जागेवर अनुपस्थित आढळून आले. त्यांचा मोबाईलही बंद होता.
पंचायत समितीतील पशुसंवर्धन विभागाच्या योजनेबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली आहे. आॅनलाईन प्रक्रिया असल्याने सर्वच शेतकऱ्यांना माहितीच आहे. लांजूड येथील शेतकरी भेटायला आल्यानंतर पशुधन पर्यवेक्षक बी.एन.बोपटे यांना बोलावून माहिती देण्यात आली.
के.डी.शिंदे, गटविकास अधिकारी, खामगाव