लाडाची लेक सीमेवर लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:36 AM2021-08-23T04:36:36+5:302021-08-23T04:36:36+5:30
संदीप वानखडे बुलडाणा : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)ची परीक्षा मुलींनाही देण्याचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता मुलींनाही ...
संदीप वानखडे
बुलडाणा : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)ची परीक्षा मुलींनाही देण्याचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता मुलींनाही सैन्यात दाखल हाेऊन सीमेवर लढण्याची संधी मिळणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे बुलडाणा शहरातील एनसीसीच्या मुलींनी स्वागत केले आहे.
देशाच्या लष्करात हल्ली वैद्यकीय, कायदेशीर, शैक्षणिक, सिग्नल आणि अभियांत्रिकी शाखांसारख्या निवडक क्षेत्रांत महिलांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार सैन्यात महिलांना पुरुष सहकाऱ्यांसारखीच संधी, लाभ मिळतील. ज्यात पद, पदोन्नती आणि निवृत्तिवेतन यांचा समावेश असेल आणि त्यांना अधिक काळ सेवा देण्याची परवानगी दिली जाणार आहे. सध्या महिलांना शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे समाविष्ट केले जाते, जे त्यांना १४ वर्षांपर्यंत काम करू देते. केवळ सैन्याच्या कायदेशीर, शैक्षणिक शाखांमध्ये कायमस्वरूपी कमिशनची परवानगी देण्यात आली आहे.
काय आहे सर्वाेच्च न्यायालयाचा निकाल
स्वतंत्र भारतात १९५८ पासून मुलींना सैन्यात भरती होण्यासाठीचा कायदा अस्तित्वात आला आहे. मात्र, मुलींना सीमेवर लढण्यासाठी पाठविले जात नाही. मात्र, न्यायालयाने लिंगाच्या आधारावर त्यांच्या क्षमतेवर शंका घेणे हे केवळ महिला म्हणून त्यांच्या सन्मानालाच नव्हे, तर भारतीय लष्कराच्या सदस्यांना मानसिकदृष्ट्या ते शिकविले गेले नाही, अशी टीका केली.
पारंपरिक पुरुषांच्या बुरुजामध्ये लिंग समानतेच्या दिशेने वाटचाल दर्शविणाऱ्या हे सर्व र्महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी सेवा, जी आतापर्यंत फक्त पुरुषांना लागू आहे, ती वाढविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
लष्करात प्रवेशासाठी...
या निर्णयाने मुलींना सैन्यात भरती होऊन गरुडझेप घेण्यासाठीची दारे खुली केली आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए, आयएमए आणि ओटीए अशा तीन माध्यमांद्वारे लष्करात प्रवेश करता येणार आहे.
बुलडाणा शहरात महाविद्यालय स्तरावर ४० मुली
बुलडाणा शहरात केवळ जिजामाता महाविद्यालयात एनसीसी कार्यान्वीत आहेत़ या महाविद्यालयात जवळपास ४० मुली एनसीसीमध्ये दरवर्षी असतात व विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शिबिरात सहभागी होत असतात अशी माहिती एनसीसी अधिकारी प्रा़ सुबाेध चिंचाेले यांनी दिली़ सध्या काेराेनामुळे महाविद्यालये बंद असल्याने एनसीसीचे कॅम्प बंद आहेत.
लेकींनी मानले सर्वाेच्च न्यायालयाचे आभार
एनडीएमध्ये मुलींना प्रवेश मिळत आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. यामुळे मुलींना आपले कौशल्य व क्षमता दाखविण्याची अनमोल संधी मिळाली आहे. प्रत्येक क्षेत्रात मुली आपले कसब दाखवीत आहेत. न्यायालयाचे आभार.
अर्चना उबरहंडे, कॅडेट
न्यायालयाने मुलींना एनडीएत संधी देऊन त्यांचा सन्मानच केला आहे. सैन्यात नाेकरी करीत असताना मुलींबराेबर हाेत असलेला भेदभावही या निर्णयाने दूर हाेणार आहे. सैन्यात दाखल हाेऊन मुली देशाचे संरक्षण करण्यास सक्षमच आहेत. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागतच.
पूजा जाधव, कॅडेट
न्यायालयाच्या निर्णयाने आनंदच झाला आहे. मुलीसुद्धा देशाचे संरक्षण करू शकतात. या निकालामुळे सैन्य दलात मुलींना संधी मिळणार आहे. सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालाबाबत त्यांचे आभार.
पूजा चव्हाण, कॅडेट