आमखेड येथील गाव तलाव फुटला;शेतात पाणीच पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 11:15 AM2021-06-29T11:15:38+5:302021-06-29T11:16:38+5:30
Lake in Amkhed bursts : चिखली, मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यातील शेकडाे हेक्टरवरील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : तालुक्यातील पूर्वेकडील भागात २८ जूनला सायंकाळी पाचच्यासुमारास सुरुवात झालेल्या पावसाने रौद्ररूप धारण केल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या भागातील गांगलगाव भागात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे आमखेड येथील पाझर तलाव फुटला आहे. या भागातील सर्वच नदी नाल्याने पूर आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.तलाव फुटल्याने चिखली, मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यातील शेकडाे हेक्टरवरील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़.
चिखली तालुक्याला पावसाची मोठी प्रतीक्षा होती. २८ जूनरोजी पाऊस सर्वत्र दमदार बरसल्याने पेरणी रखडलेले शेतकरी सुखावले आहेत. मात्र, ज्या भागात आधी पेरण्या झालेल्या होत्या व जिथे पावसाची आवश्यकता नव्हती, त्या भागात आज ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. यामध्ये मंगरूळ नवघरे, डोंगरगाव, पाटोदा, सावरखेड, एकलारा, वरखेड, भोरसा-भोरसी, गांगलगाव व परिसरातील गावांमध्ये सुमारे दीड ते दोन तास धुव्वाधार पाऊस कोसळल्याने या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात आधी पेरणीयोग्य पाऊस झालेला होता. त्यामुळे या भागातील खरिपाच्या पेरण्या उरकल्या होत्या. मात्र, या पावसाने अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे वाहून गेले, शेतजमिनी खरडून गेल्या आहेत.
भाेगावती नदीला महापूर
गांगलगाव शिवरात कोसळलेल्या जोरदार पावसामुळे आमखेड येथील मध्यम स्वरूपाचा पाझर फुटला असून मातीचा बांध वाहून गेला आहे. या तलावाच्या फुटण्यामुळे गावास कोणताही धोका नव्हता मात्र, त्याच्या फुटण्याने तलावाखालील शेती क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान आजच्या पावसाचे कुठेही जिवीत हानी झालेली नसली तरी वित्त हानी मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता असल्याचे तहसीलदार अजितकुमार येळे यांनी म्हटले आहे. दरम्यान पाझर तलाव फुटल्याने लव्हाळा साखरखेर्डा मार्गावरील भोगावती नदीला महापूर आला होता.