लाखो भाविकांनी फुलली संतनगरी; ‘श्रीं’चा प्रकट दिन सोहळा उत्साहात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:06 AM2018-02-08T01:06:25+5:302018-02-08T01:08:32+5:30
जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते... नामघोष करीत ३ लाख भाविक भक्तांचा भक्तीसागर व १३१८ भजनी दिंड्यांच्या सहभागातून श्रींचा १४0 वा प्रकट दिन उत्सव ७ रोजी भक्तीमय वातावरणात पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : ‘अनु रेणुमध्ये ब्रम्ह व्यापीले लय उत्पत्ती समान।
माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रकटला योगी महान।।
गजानना अवलीया, अवतरले जग ताराया।
जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते।।
नामघोष करीत ३ लाख भाविक भक्तांचा भक्तीसागर व १३१८ भजनी दिंड्यांच्या सहभागातून श्रींचा १४0 वा प्रकट दिन उत्सव ७ रोजी भक्तीमय वातावरणात पार पडला.
बुधवार माघ वद्य ७ फेब्रुवारी रोजी हा श्रींचा प्रकट दिन यासाठी भक्तांनी रात्रीपासून श्रींच्या समाधी दर्शनासाठी आनंद सागर विसावापर्यंत श्रींच्या समाधी दर्शनासाठी रांग लावली होती. श्रींचा प्रकट दिन उत्सव संस्थानच्यावतीने १ पासून ७ रोजी उत्सवात काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तनद्वारे भक्तांच्या उपस्थितीत घेण्यात आले. ७ रोजी श्रीरामबुवा ठाकूर मु. परभणी यांचे सकाळी १0 ते १२ ‘शेगावी श्रींच्या प्रागट्या’ निमित्त कीर्तन करण्यात आले. यात हजारो भक्तांनी श्रवणाचा लाभ घेतला.
सकाळी १0 वा. यागाची पूर्णाहूती व अवभृतस्नान श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले. यावेळी श्री गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष नारायणराव पाटील, कार्यकारी विश्वस्त नीळकंठदादा पाटील, डॉ.रमेश डांगरा, गोविंदराव कलोरे, अशोकराव देशमुख, किशोर टांक, पंकज शितुत, चंदुलालजी अग्रवाल, प्रमोद वसंतराव गणेश या विश्वस्त मंडळांची प्रामुख्याने उपस्थिती होती. दुपारी १२ वा. श्रींचे प्रागट्यानिमित्त संस्थानच्यावतीने श्रींच्या समाधी मंदिरावर भक्तांच्या मांदियाळीत व कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत श्रींचे भक्त यांनी श्रींच्या समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी केली. मनोभावे श्रींच्या भक्तांनी आंतरिक भावेने पुष्पांची भावरूपी भक्ती श्रींच्या चरणी अर्पण केली.
ठिकठिकाणी महाप्रसाद व धार्मीक कार्यक्रम
शेगावसह घाटाखालील खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात अनेक गावांमध्ये श्री. गजानन महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम पार पडले. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दरम्यान, सामाजिक संस्थांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. श्रींचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शेगाव मार्गावर दिवसभर भाविकांची गर्दी दिसून आली.