जनप्रबोधनात्मक सार्वजनिक गणेश मंडळांना लाखोंचे बक्षीस
By admin | Published: August 23, 2016 01:49 AM2016-08-23T01:49:31+5:302016-08-23T01:49:31+5:30
पर्यटन व सांस्कृतिक विभागाचा उपक्रम.
हर्षनंदन वाघ
बुलडाणा, दि. २२: स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाव, व्यसनमुक्ती व जलसंवर्धन यापैकी एका कल्पनेशी निगडित देखावा तयार करून जनप्रबोधन करणार्या सार्वजनिक गणेश मंडळासाठी विभागनिहाय प्रथम दोन लाख, द्वितीय दीड लाख व तृतीय क्रमांकाच्या मंडळास एक लाखाचे बक्षीस देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासाठी लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान व लोकमान्य उत्सवाचे आयोजन केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव चळवळीला १२५ वर्षे पूर्ण होत असल्याने लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान आणि लोकमान्य उत्सव, असे दोन सांस्कृतिक उपक्रम २0१६ आणि २0१७ या दोन वर्षात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. स्पर्धेत राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. त्याकरिता मंडळाची धर्मदाय आयुक्त याच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. मंडळानी अर्ज संबंधित तालुक्याच्या गट शिक्षण अधिकार्याकडे करावयाचा आहे. २९ जुलै ते २९ ऑगस्ट २0१६ या कालावधीत गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात माहिती सादर करावी, असे आवाहन शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने केले आहे.