शासकीय दरवाढीनंतर होणार जमिनीचे अधिग्रहण!
By admin | Published: January 24, 2017 02:28 AM2017-01-24T02:28:07+5:302017-01-24T02:28:07+5:30
समृद्धी महामार्गासाठी शेतक-यांना मिळणार पाच पट पैसे.
विवेक चांदूरकर
बुलडाणा, दि. २३- नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या सर्वेक्षणासाठी प्रारंभ झाला असून, भूमी अधिग्रहीत करताना शेतकर्यांना शेतीच्या शासकीय दराच्या पाच पट भाव देण्यात येणार आहे. एप्रिलनंतर जिल्ह्यातील जमिनीचा शासकीय दर (रेडी रेकनर) वाढणार असून, त्यानंतर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे.
नागपूर ते मुंबईपयर्ंत ७१0 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग होणार आहे. हा महामार्ग जिल्ह्यातील मेहकर व लोणार तालुक्यातून जाणार आहे. सध्या या महामार्गाचे सर्वेक्षणाचे काम सुरू असून, लवकरच जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. या महामार्गालगत जिल्ह्यात तीन ठिकाणी नवनगरे निर्माण करण्यात येणार आहेत. या महामार्गासाठी तसेच नवनगरांमध्ये शेती जाणार्या शेतकर्यांना शासकीय भावाच्या पाच पटीने भाव मिळणार आहे, तसेच भूमी अधिग्रहणाचे तीन प्रकार शासनाच्यावतीने शेतकर्यांसाठी खुले करण्यात आले आहे. मेहकर व लोणार तालुक्यातील शेतांमध्ये १00 टक्के सिंचन होत नसले, तरी या भागात हंगामी ओलित करण्यात येते, त्यामुळे संपूर्ण शेतीला हंगामी शेतीचा दर लावण्यात येणार आहे.
जमीन अधिग्रहित करताना शासकीय किमतीच्या पाच पटीचा दर ठरविण्यात आला आहे. आतापर्यंंत दरवर्षी जानेवारी महिन्यात जमिनीचा शासकीय दर वाढत होता. यावर्षी मात्र एप्रिल महिन्यानंतर शासकीय दर वाढणार आहे. जिल्ह्यातील शेतीचे त्यानंतर अधिग्रहण करण्यात येणार असल्यामुळे शेतकर्यांना त्याचा फायदा होणार आहे.
भूमी अधिग्रहणाच्या तीन पद्धती
1. महामार्गात शेती गेलेल्या शेतकर्यांना जेवढी शेती गेली त्याच्या २५ ते ३0 टक्के जागेचा प्लॉट नवनगरांध्ये मिळणार आहे., तसेच दहा वर्षापर्यंत पैसे मिळणार आहेत.
2. नवनगरांमध्ये प्लॉट घेण्यास इच्छुक नसलेल्या शेतकर्यांना शासकीय दराच्या पाच पटीने भाव मिळणार आहेत.
3. या दोन्ही अटींमध्ये बसण्यास तयार नसलेल्या शेतकर्यांची शेती अधिग्रहित करण्याचा संपूर्ण अधिकार शासनाला असून, ज्यांची शेती अधिग्रहित केल्या जाईल. या शेतकर्यांना शासकीय दराच्या चार पटीने भाव देण्यात येणार आहे.