गुणवंत विद्यार्थ्याला दिला लॅपटॉप भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:33 AM2021-08-29T04:33:00+5:302021-08-29T04:33:00+5:30
जानेफळ : अभ्यासात हुशार आणि बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यास परिस्थितीमुळे हतबल व्हावे लागत असताना शिक्षकांनी त्याच्या मदतीसाठी ...
जानेफळ : अभ्यासात हुशार आणि बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यास परिस्थितीमुळे हतबल व्हावे लागत असताना शिक्षकांनी त्याच्या मदतीसाठी पुढाकार घेत त्याला पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करून त्याला अभ्यासासाठी स्वखर्चाने लॅपटॉप खरेदी करीत भेट दिला आहे.
येथील सरस्वती विद्यालयात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी ऋषिकेश राठोड हा नुकताच दहावीच्या परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवीत उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. तसेच त्याने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परीक्षेतसुद्धा घवघवीत यश मिळविले आहे़ परंतु, घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्याला आवश्यक पुरेशा सुविधा मिळत नसल्याने हतबल होण्याची वेळ आल्याने येथील सरस्वती विद्यालयातील काही शिक्षकांना याची माहिती मिळताच त्यांनी वर्गणी गाेळा करून लॅपटॉप ऋषिकेश राठोड यास अभ्यासासाठी भेट दिला आहे.
२५ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार समारंभात संस्थेच्या अध्यक्षा विजयाताई मिटकरी, प्रमुख अतिथी संचालक मंडळाचे दिनेश मिटकरी, प्रवीण रेदासनी, संतोष तोंडे, संतोष नाहटा, किरणताई चांदणे यांच्या हस्ते ऋषिकेश राठोड यास हा लॅपटॉप भेट देण्यात आला. यावेळी प्राचार्य रवींद्र बोंडगे, उपप्राचार्य डी. आर. माळी, पर्यवेक्षक अशोक खोरखेडे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग तथा पत्रकार बांधव उपस्थित होते.