साेयाबीन उगवण क्षमता मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवा : श्वेता महाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:36 AM2021-05-09T04:36:00+5:302021-05-09T04:36:00+5:30
चिखली : तालुक्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या उगवण क्षमतेबाबत गतवर्षी झालेल्या तक्रारी आणि शेतकऱ्यांचे नुकसान पाहता, यंदा सोयाबीन ...
चिखली : तालुक्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या उगवण क्षमतेबाबत गतवर्षी झालेल्या तक्रारी आणि शेतकऱ्यांचे नुकसान पाहता, यंदा सोयाबीन उगवण क्षमता मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी, तसेच कुठेही खते व बियाणे कमी पडणार नाही आणि बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, अशा सूचना आमदार श्वेता महाले यांनी तालुक्याच्या खरीपपूर्व आढावा सभेत दिल्या.
चिखली तालुक्याची सन २०२१-२२ खरीप पूर्व आढावा सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार श्वेता महाले होत्या. या सभेत तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी कृषी विभागामार्फत खरीप हंगामात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेबाबत माहिती दिली, तसेच शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन विक्री न करता, ते बियाणे म्हणून वापरावे व शिल्लक बियाणे असल्यास व्यापाऱ्यांना न विकता इतर शेतकऱ्यांना बियाणे म्हणून विकावे, असे आवाहन केले. दरम्यान, तालुक्याला लागणाऱ्या सोयाबीन बियाणे व उपलब्धतेबाबत सभेमध्ये सविस्तर चर्चा झाली. बियाणे उगवण क्षमता चाचणी केल्याशिवाय पेरणी करू नये, बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, बीबीएफद्वारे पेरणी अथवा पट्टा पद्धतीने पेरणी, सोयाबीन चक्रिभुंगा व खोडमाशी नियंत्रण मोहीम, कापूस पीक एक गाव एक वाण, गुलाबी बोंड अळी नियंत्रण मोहीम, तूर पिकामध्ये ३०, ४५ व ६० दिवसांनी शेंडे खुडने, मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण मोहीम, विकेल ते पिकेल अभियान, खते व बियाणे आवश्यकता व उपलब्धता बाबत माहिती या सभेत देण्यात आली. दरम्यान, पीक कर्ज वाटपाबाबत आढावा घेण्यात आला. यामध्ये आमदार श्वेता महाले यांनी पीक कर्ज जूनपूर्वी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यासह सर्व विभागांनी कोविड १९ परिस्थितीत योग्य नियोजन करून खरीप हंगाम यशस्वी करण्याबाबत सांगितले. सभेस जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तहसीलदार डॉ.अजितकुमार येळे, गटविकास अधिकारी जाधव व सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.