पाच वर्षांपासून तलाठी कार्यालयाचे भाडे थकीत!
By admin | Published: June 30, 2017 12:39 AM2017-06-30T00:39:16+5:302017-06-30T00:39:16+5:30
आंदोलन करण्याचा विदर्भ पटवारी संघाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : जिल्ह्यातील तलाठी कार्यालयाचे भाडे सन २०१२ पासून प्रलंबित आहे. त्यामुळे याचा आर्थिक बोझा तलाठ्यांना सहन करावा लागत आहे. नियमितपणे घरभाडे मिळत नसल्याने काही घरमालकांकडून जागा खाली करण्याच्या सूचना दिल्याने तलाठीवर्ग अडचणीत सापडला आहे. याची दखल घेऊन तातडीने या समस्येचा निपटारा करण्यात यावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विदर्भ पटवारी संघाच्यावतीने देण्यात आला आहे.
यानुषंगाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे, की जिल्ह्यातील अनेक तलाठी कार्यालये खासगी जागेमध्ये आहेत. शासनाने २०१३ पासून खासगी जागेची भाडेवाढ ग्रामीण भागासाठी एक हजार, तर शहरी भागासाठी दोन हजार रुपये अशी ठरविलेली आहे. त्यानुसार आजरोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुमारे चार कोटी रुपयांचे भाडे थकलेले आहे. त्यामुळे जागा मालक व तलाठी यांच्यात वाद होत आहेत. तलाठ्यांनी खिशामधून हजारो रुपये भाड्यापोटी दिलेले आहेत. काही घरमालकांनी तलाठ्यांना घर खाली करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तलाठी आॅनलाइन कामाने त्रस्त असताना घरमालकांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्रास देणे सुरू केले आहे. त्यामुळे तलाठीवर्ग मानसिक विवंचनेत आहेत. याची दखल घेऊन तत्काळ थकीत भाडे शासनाकडून प्राप्त करून घेऊन जिल्ह्यातील तलाठी कार्यालयांचे भाडे अदा करण्यात यावे, अन्यथा पहिल्या टप्प्यात प्रातिनिधिक स्वरूपात ३० जून रोजी चिखली तालुक्यातील सर्व तलाठी आपले तलाठी कार्यालय तहसील आवारात उघड्यावर चालवतील व १ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व तलाठी महसूल दिनावर बहिष्कार टाकून जिल्हधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करतील. इत:पर मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विदर्भ पटवारी संघाने दिला आहे.