पतीच्या उपचारासाठी सुरू केलेली लता करेंची मॅरेथॉन धाव थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:36 AM2021-05-07T04:36:40+5:302021-05-07T04:36:40+5:30
बारामती येथी रुग्णालयात भगवान करे यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी संसर्गामुळे त्यांचे निधन झाले. लता करे यांचे पती ...
बारामती येथी रुग्णालयात भगवान करे यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी संसर्गामुळे त्यांचे निधन झाले. लता करे यांचे पती महिला हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होते. २०१३ मध्ये त्या प्रथम पतीच्या हृदयविकारावरील उपचाराचे पैसे मिळविण्यासाठी मॅरेथॉनमध्ये कडाक्याच्या थंडीत अनवाणी धावल्या. पतीच्या उपचारासाठी वयाच्या ६४ व्या वर्षी धावणाऱ्या लता करे यांचे विजयानंतर सर्वत्र कौतुक झाले. त्यानंतर सलग तीन वर्षे त्यांनी वयाची तमा न बाळगता बारामती येथील मॅरेथॉन स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक साधली होती. तिसऱ्या वर्षी त्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावल्या होत्या. हृदयविकाराच्या आजारातून त्यांनी पतीला वाचवले; पण संसर्गापासून त्या पतीला वाचवू शकल्या नाहीत. करे यांच्या तिन्ही मुलींचे विवाह झाल्यावर हे कुटुंब सुमारे ९ वर्षांपूर्वी मेहकर तालुक्यातून बारामतीत वास्तव्यास गेले होते. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मोहना फॉरेस्ट येथे उत्पन्नाचे साधन नसल्याने या कुटुंबाने बारामतीत स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांचा मुलगा एका कंपनीत चौकीदाराची नोकरी करतो. हे कुटुंंब एका भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहे.
--करे यांच्या जीवनावर चित्रपटही--
पतीसाठी अनवाणी धावत स्पर्धा जिंकणाऱ्या करे यांची आयुष्याच्या सत्तरीकडे वाटचाल करणाऱ्या वयातील जिद्द आणि यश पाहून त्यांच्या जीवनावर लता भगवान करे ‘एक संघर्षकथा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. त्यांनीच चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. दाक्षिणात्य निर्माते ए. कृष्णा अरुबोधू यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती, तर नवीन देशबोईना यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपटास ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे.
--मालकाचा आधार गेला--
आपल्या जीवनात पती भगवान करे यांचा मोठा आधार होता. मालकाचा आधारच आता गेला. आता मुलगा सुनील आहे. त्याच्या आयुष्याचे काही तरी चांगले व्हावे, अशी अपेक्षा आहे. आपल्या संघर्षाची चर्चा जगभर झाली. मुलाचेही चांगले व्हावे, ही अपेक्षा आहे.
(लता करे)