खामगावात मत्स्य विकासाला चालना
By Admin | Published: November 17, 2014 12:41 AM2014-11-17T00:41:36+5:302014-11-17T00:41:36+5:30
जनुना तलावातील मासोळ्या काढण्यास प्रारंभ : पालिकेचे उत्पन्न पोहोचले ३३ लाखांवर.
खामगाव (बुलडाणा): केंद्र शासन व राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय व मत्स्यसंवर्धन विकास महामंडळाच्या कुठल्याही मदतीविना खामगाव नगरपालिकेच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या जनुना तलावातून मासोळ्या काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता खामगावसह परिसरातील नागरिकांना ताज्या मासोळींची चव चाखायला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तथापि, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे खामगाव नगरपालिकेच्या उत्पन्नात तब्बल तीसपटीने वाढ झाली आहे. खामगाव शहरापासून जवळच असलेल्या जनुना परिसरात खामगाव नगरपालिकेच्या मालकीचा २२0 एकराच्या विस्तीर्ण परिसरात १५0 वर्षे जुना तलाव आहे. या इंग्रजकालीन तलावाचा पूर्वी पाणीपुरवठय़ासाठी वापर केला जायचा. मात्र, वाढलेली लोकसंख्या व नवीन मंजूर झालेल्या जलशुद्धीकरणासह पाणीपुरवठा योजना यामुळे जनुना तलाव कालबाह्य होऊन गेल्या सात-आठ वर्षांपासून हा तलाव शोभेची वस्तू बनला होता. याच काळात तलावातील माश्या काढण्यासाठी स्थानिक मासेमारांना एक ते दोन लाख रुपयांमध्ये मासेमारीसाठी परवानगी दिली जायची. यामुळे महापालिकेला फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे गेल्यावर्षी प्रथमच खामगाव नगरपालिकेने जनुना तलावामध्ये लाइव्ह फिश डेव्हलपमेंट या अभिनव प्रकल्पाची आखणी केली. परिसरासह जिल्ह्याबाहेरील मत्स्यव्यवसाय विकासकांना जाहीर निविदेद्वारे आमंत्रित करण्यात आले. त्यानुसार मत्स्य व्यवसायासाठी जळगाव खान्देश येथील मयुराज सहकारी मत्स्यव्यवसाय संस्थेशी तीन वर्षांसाठी करारनामा करण्यात आला. या करारनाम्यापोटी पहिल्या वर्षी पालिकेला ९.५0 लाख रुपये मिळाले. दुसर्या वर्षी यामध्ये दहाटक्के वाढ होऊन १0.५0 लाखांचा अग्रीम मिळाला आहे, तर तिसर्या वर्षी पुन्हा दहाटक्के वाढ गृहित धरून ११.५0 रुपये अशाप्रकारे पालिकेला तीन वर्षांमध्ये ३३ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. दरवर्षी मत्समारीमुळे खामगाव नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडत आहे. या अभिनव उपक्रमाचे कौतुक होत आहे.