पावसाळा संपताच समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाचा शुभारंभ - विनायक मेटे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 02:04 PM2018-07-08T14:04:45+5:302018-07-08T14:05:07+5:30
अरबी समुद्रात होणा-या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासंदर्भात आठ दिवसापूर्वीच एल अॅन्ड टी कंपनी सोबत करार झाला असून पावसाळा संपल्यावर शिवस्मारकाचे कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे यांनी येथे दिली.
-अनिल उंबरकार
शेगाव - अरबी समुद्रात होणा-या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासंदर्भात आठ दिवसापूर्वीच एल अॅन्ड टी कंपनी सोबत करार झाला असून पावसाळा संपल्यावर शिवस्मारकाचे कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे यांनी येथे दिली. विश्राम भवनमध्ये रविवारी ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शिवसंग्रामची बैठक पार पडली. बैठकीत शिवसंग्रामच्या गाव तेथे शाखा स्थापन करून संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना पुढे म्हणाले की, शिवस्मारकासोबत लंडनमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकतसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. पूर्वीच्या सरकारपेक्षा भाजपा - महायुतीचे सरकारने सर्वात जास्त कर्ज माफी शेतक-यांसाठी केली.
यामध्ये आॅनलाईन पद्धतीनं कर्जमाफीचे अर्ज भरून घेतल्याने भ्रष्टाचाराला फटका बसला. गत चार वर्षांत वेळोवेळी विविध शेतीपिकांना पिकविमा दिला. शेतकरी वर्गाला एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जमाफी देणार हे पहीलं सरकार असून देवेंद्र फडणवीस सरकारच कौतुक नक्की केल पाहिजे असेही मेटे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याला दिशा देणारं , व्हीजन असणारं कर्तृत्वान नेतृत्व असल्याची प्रशंसासुद्धा त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील शिवशाहीच राज्य स्थापनेच्या दृष्टीने शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी काम करावं , त्याचे विचार ही आचरणात आणावे असे आवाहनही आ. विनायक मेटे यांनी शेवटी केले. यावेळी अजय बिल्लारी, वंदना निकम, पंजाबराव देशमुख, रंगराव देशमुख, सरपंच डॉ सुरज पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.