देऊळगाव राजा तालुक्यात स्मार्ट काॅटन प्रकल्पास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:24 AM2021-07-18T04:24:53+5:302021-07-18T04:24:53+5:30
देऊळगाव राजा : तालुक्यात या वर्षीपासून स्मार्ट कॉटन हा प्रकल्प पहिल्यांदाच राबविण्यात येत असून, जिल्ह्यामध्ये फक्त देऊळगाव राजा आणि ...
देऊळगाव राजा : तालुक्यात या वर्षीपासून स्मार्ट कॉटन हा प्रकल्प पहिल्यांदाच राबविण्यात येत असून, जिल्ह्यामध्ये फक्त देऊळगाव राजा आणि जळगाव जामोद या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे़ स्मार्ट कॉटनअंतर्गत तालुक्यात देऊळगाव राजा आणि देऊळगाव माही असे दोन क्लस्टर निवडण्यात आले असून, या क्लस्टरमध्ये नमन कॉटन मिल आणि सागर ॲग्राे या दोन जिनिंग मिलबरोबर महाराष्ट्र कॉटन फेडरेशनने करार केलेला आहे.
या प्रकल्पांमधील बोरखेडी बावरा या गावाला कृषी व पणन सचिव एकनाथ डवले यांनी १६ जुलै राेजी भेट देऊन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी वसंत राठोड, तालुका कृषी अधिकारी देऊळगाव राजा रोहिदास मासळकर, मंडळ कृषी अधिकारी, देऊळगाव राजा सतीश दांडगे, कृषी पर्यवेक्षक, समाधान गाडेकर, कृषी सहायक नीलकंठ तायडे, श्रीकांत पडघन, अनंत देशमुख, नंदू शिंगणे, आदी उपस्थित होते. डवले यांनी ज्ञानेश्वर कौतिकराव शेरे यांच्या स्मार्ट कॉटनमधील कापूस पिकाच्या शेतास भेट दिली. यावेळी गावच्या सरपंच निर्मलाबाई भुजंगराव खरात, उपसरपंच सचिन वाहूळ व स्मार्ट कॉटन समूहाचे गावाच्या ग्रुपचे प्रमुख संतोष साहेबराव शेरे व सुमारे ५० शेतकरी उपस्थित होते.
नावीन्यपूर्ण प्रकल्पाचा लाभ घ्यावा
ही योजना नसून हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम आहे़ यामध्ये यश मिळाल्यास कापूस पिकामध्ये एक नवीन सुरुवात होऊ शकते़ तसेच याद्वारे शेतकऱ्यांचा बाजारपेठेत शिरकाव होईल आणि त्यांना नेहमीपेक्षा जास्तीचा बाजारभाव मिळू शकेल. स्मार्ट कॉटनचे हे प्रथम वर्ष असल्याने काही अडचणी येऊ शकतात़; परंतु हा उपक्रम खरोखर फायद्याचा आहे, असे मत एकनाथ डवले यांनी यावेळी व्यक्त केले़
२६ गावांची निवड
या २ क्लस्टरमध्ये एकूण २६ गावे निवडली आहेत. तालुक्यात एकूण २६२४ शेतकऱ्यांनी या प्रकल्पात सहभाग नोंदविला असून एकूण ३४३९ हेक्टर क्षेत्र या प्रकल्पात समाविष्ट आहे. या गावांमध्ये शंभर ते दीडशे शेतकऱ्यांचा समूह तयार करण्यात आला असून, त्यांनी त्यांच्या गावांमध्ये सर्वांत जास्त पिकविला जाणारा कापसाचा वाण पेरणी केलेला आहे. या शेतकऱ्यांनी कापूस विकण्याऐवजी सरकी व कापसाच्या गाठी थेट विकणे अभिप्रेत आहे. याद्वारे शेतकरी फक्त उत्पादकाच्या भूमिकेत न राहता तो बाजारपेठ व विपणन यांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार आहे.
महाकाॅट नावाने ब्रँड हाेणार विकसित
एका गावात एकच वाण निवडल्याने व या कापसाची स्वतंत्रपणे जिनिंग केल्याने एकसमान लांबीच्या धाग्याच्या गाठी तयार होऊन त्यामध्ये महाकॉट नावाने ब्रँड विकसित होऊ शकतो. प्रत्येक गावातील एकाच वाणाचा स्वच्छ व भेसळ नसलेला, फरदडमुक्त, चांगल्या प्रतीचा कापूस शेतकरी स्वतंत्रपणे साठवून समूहाच्या माध्यमातून एकाच वेळी जिनिंगसाठी देणार आहे. या प्रकल्पात शेतकरी, कृषी विभाग, महाराष्ट्र कॉटन फेडरेशन हे संयुक्तपणे समाविष्ट आहे. एक समान धागा, स्वच्छ कापूस आणि थेट विपणन त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला जास्तीचा बाजारभाव मिळणार आहे.