मुलास तप्त तव्यावर उभ्या करणाऱ्या सावत्र आईस जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:18 AM2020-12-28T04:18:23+5:302020-12-28T04:18:23+5:30
नांदुरा तालुक्यातील जवळपा बाजार येथील एका आठ वर्षीय मुलास सावत्र आईने तप्त तव्यावर उभे केल्याने त्याच्या तळपायाला जखमा झाल्या ...
नांदुरा तालुक्यातील जवळपा बाजार येथील एका आठ वर्षीय मुलास सावत्र आईने तप्त तव्यावर उभे केल्याने त्याच्या तळपायाला जखमा झाल्या होत्या. त्याच्यावर खामगाव, अकोला येथे उपचार करण्यात आले होते. त्यानंतर मुलाला बाल कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले होते. ही घटना १५ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी २६ डिसेंबर रोजी मुलाचा मामा वैभव मानकर यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी मुलाची सावत्र आई शारदा शिंगोटे यांच्याविरोधात बाल न्याय अधिनियम २०१५ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २७ डिसेंबर रोजी या महिलेस मोताळा न्यायालयात हजर केले असता न्यायालायने जामीन दिला आहे. सध्या पीडित मुलगा हा बाल कल्याण समितीच्या ताब्यात असून जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत
... तर किमान पाच वर्षे शिक्षा
या प्रकरणात बाल न्याय अधिनियम २०१५ आणि गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित महिला दोषी आढळून आल्यास तिला किमान पाच वर्षे शिक्षा व तीन लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.