कर्जमाफीत बुलडाण्यातील नेत्यांची मोलाची भूमिका!
By admin | Published: June 13, 2017 01:41 AM2017-06-13T01:41:15+5:302017-06-13T01:41:15+5:30
कृषी मंत्री फुंडकर यांचा प्रत्यक्ष सहभाग : तुपकरांनी बजावली पडद्यामागे कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गेल्या दोन महिन्यांपासून ऐरणीवर आलेल्या कर्जमाफीच्या मागणीसाठी १ जूनपासून सुरू झालेला शेतकऱ्यांचा संप व त्या अनुषंगाने राज्यभर उठलेले आंदोलनाचे मोहळ, या पृष्ठभूमीवर सरकारने एक पाऊल मागे घेत शेतकरी नेत्यांशी चर्चा करून रविवारी कर्जमाफी जाहीर केली. या कर्जमाफीसाठी गठीत झालेल्या उच्चाधिकार मंत्रीगटात पश्चिम वऱ्हाडातील ज्येष्ठ नेते व राज्याचे कृषी मंत्री ना.पांडुरंग फुंडकर यांचा समावेश होता. शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये उच्चाधिकार मंत्रीगटाचे सदस्य म्हणून त्यांनी प्रत्यक्षात भूमिका बजावली, तर शेतकरी नेते व सरकारमधील दुवा म्हणून वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर यांनी जबाबदारी पार पाडली.
कृषी मंत्री ना.फुंडकर हे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी नेते आहेत. कृषी, पणन व सहकार क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी असल्याने शेतकरी संपामध्ये त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली असली, तरी प्रत्यक्षात मात्र कृषी मंत्री कुठेच दिसत नाही, अशी हाकाटी पिटण्यात आली. खरेतर शेतकरी संपाची हाक आल्यानंतरच कृषी मंत्री म्हणून त्यांनी शेतकरी संघटनांच्या विविध नेत्यांशी चर्चा सुरू केली होती. शेतकऱ्यांनी संप करू नये, सरकार कर्जमाफीसह शाश्वत सिंचन व शेतीच्या संदर्भात उपाययोजना करीत आहे, शेतकऱ्यांनी संप करु नये, आवाहन त्यांनी केले होते; मात्र तरीही शेतकरी संप सुरू झाला त्यानंतर मात्र सारी सूत्रे मुख्यमंत्र्यांनी हातात घेतली व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना काही भूमिका वाटून दिल्या. मुख्यमंत्र्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना समोर करीत शेतकरी नेत्यांशी घडवून आणलेल्या चर्चा असोत की, सदाभाऊंनी दिलेली विविध वक्त व्य असोत, त्यामागे मुख्यमंत्र्याची राजकीय खेळी होती. या सर्व कालावधीत प्रशासकीय व मंत्रिमंडळ पातळीवर कर्जमाफीसंदर्भात चाचपणी केली जात होती.
राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कर्जमाफीच्या दृष्टीने अल्पभूधारक शेतकऱ्यांची महिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले होते. बहुतांश जिल्हाधिकाऱ्यांनी ४ व ५ जून रोजी जिल्हानिहाय आकडेवारी सादरही केली होती. या सर्व घडामोडींमध्ये ना. फुंडकर यांची भूमिका महत्त्वाची होती, हे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी सुकाणू समितीच्या नेत्यांशी चर्चेसाठी नेमलेल्या उच्चाधिकार मंत्रीगटामध्ये ना. फुंडकरांचा समावेश केल्यानंतर ना. फुंडकरांनी शेतकरी संघटनेच्या विविध नेत्यांशी संवाद साधताना, कर्जमाफीसाठी अल्पभूधारक शेतकरी केंद्रबिंदू राहील, यासंदर्भात पाठपुरावा केला. विदर्भामध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने कर्जमाफीचा लाभ सर्वाधिक शेतकऱ्यांना झाला पाहिजे, या दृष्टीने हा मुद्दा महत्त्वाचा होता. खुद्द मुख्यमंत्रीसुद्धा अल्पभूधारकांच्या कर्जमाफीसाठी आग्रही असल्याने सुकाणू समितीच्या सदस्यांशी या विषयावर सकारात्मक चर्चा होऊन फलीत हाती आले आहे.
तुपकरांची मध्यस्थी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व राज्याच्या वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री व शेतकरी नेते यांच्यामध्ये दूवा म्हणून भूमिका बजावल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्मक्लेष पदयात्रा व सदाभाऊंचे वाढते भाजपाप्रेम यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधील संबंध अतिशय तणावाचे झाले होते. पदयात्रेनंतर नाशिक येथे झालेल्या बैठकीत खा.शेट्टी यांनी सरकारवर आसूड ओढत सदाभाऊंच्या निष्कासनाचे संकेत दिले होते. या पृष्ठभूमीवर सुकाणू समितीच्या सदस्यांनी खा.शेट्टी यांनाच समोर करीत सरकारशी चर्चा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या दोन नेत्यांमधील कटूता दूर करण्यासाठी ना.रविकांत तुपकर यांची भूमिका मोलाची राहिली.
ना.तुपकर हे सरकारमध्ये सहभागी असतानाही आत्मक्लेष यात्रा व संघटना पातळीवर आंदोलनात तुपकरांचा पुढाकार महत्त्वाचा राहिला आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्री पदाचा दर्जा असतानाही खोतांप्रमाणे त्यांचा संघटनेशी संबध संपलेला नाही त्यामुळेच खा.शेट्टी यांच्यासोबत ते प्रत्येक आंदोलनात हिरीरीने पुढे होते. ना. खोत यांचा स्वाभिमानीसोबत दूरावा वाढल्यानंतर आपसूकच खा.राजू शेट्टी यांच्यानंतर क्रमांक दोनची जबाबदारी तुपकरांकडे आल्याने त्यांचे संघटनेतील महत्व वाढले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी खा.शेट्टीसोबतच इतर नेत्यांसोबत निर्माण झालेली कटूता दूर करण्यासाठी तुपकरांना समोर केल्याची माहिती आहे. शुक्रवार व शनिवार हे दोन दिवस पडद्यामागे खूप मोठ्या घडामोडी झालेले दिवस ठरले. या दोन दिवसातच शेतकरी नेत्यांचा कानोसा घेत कर्जमाफीबाबत सरकारी पातळीवर नियोजन सुरू करण्यात आले होते. तुपकरांनीही पडद्यामागे राहत शेतकरी संघटनांच्या मागण्यांना कुठेही धक्का लागणार नाही, याचा विचार करीत ‘दुवा’ म्हणून उत्तम भूमिका साकारली.