सर्वांवर प्रेम करणे शिका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:24 PM2017-08-24T23:24:13+5:302017-08-24T23:25:39+5:30
खामगाव : दररोज ताजे व स्वच्छ अन्न घ्यावे. योग्य पद्धतीने भरपूर व्यायाम करावा आणि स्वत:सह लोकांवर, समाजावर प्रेम करणे शिकावे, असे केल्यास हार्ट अटॅक, कॅन्सर यासारख्या अनेक दुर्धर आजारावर मात करता येणे शक्य आहे, असे सांगून जीवनशैलीत कोणते बदल घडवायचे, याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन डॉ.अविनाश सावजी यांनी केले. तरुणाई फाउंडेशनने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : दररोज ताजे व स्वच्छ अन्न घ्यावे. योग्य पद्धतीने भरपूर व्यायाम करावा आणि स्वत:सह लोकांवर, समाजावर प्रेम करणे शिकावे, असे केल्यास हार्ट अटॅक, कॅन्सर यासारख्या अनेक दुर्धर आजारावर मात करता येणे शक्य आहे, असे सांगून जीवनशैलीत कोणते बदल घडवायचे, याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन डॉ.अविनाश सावजी यांनी केले. तरुणाई फाउंडेशनने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.
येथील कोल्हटकर स्मारकमध्ये २२ ऑगस्ट रोजी ‘निरोगी राहा, दीर्घायुषी बना’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी नगराध्यक्ष अनिता डवरे, खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष आशिष चौबीसा, उद्योजक अनिल विकमसी, तरुणाई फाउंडेशन अध्यक्ष नारायण पिठोरे यांची उपस्थिती होती. वृक्ष पूजनाने व अतिथींना वृक्ष देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
डॉ.सावजी यावेळी म्हणाले, की मानवी शरीराची रचना १२0 वर्षे जगण्याची आहे; मात्र चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण आयुष्याला धोकादायक स्थितीत आणून ठेवले आहे. आपल्या संस्कृतीतील जुन्या आहार पद्धतीला फाटा दिल्याने अनेक आजार ओढवून घेतले आहेत. हृदयविकार, कॅन्सर यासारख्या आजारांवर आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान वापरत असताना आपण सहजपणे करता येण्यासारखे उपाय दुर्लक्षित करीत आहोत, वाढते वजन, व्यसनाधीनता व नैराश्य पसरलेल्या संपूर्ण समाजालाच आजाराची लागण झाली आहे. या सर्व व्याधींमधून बाहेर कसे पडावे, यावर डॉ.सावजींनी अनेक छोटे व सहज करण्यासारखे उपाय सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अरविंद शिंगाडे तर प्रास्ताविक उमाकांत कांडेकर यांनी केले. तरुणाईचे सचिव राजेंद्र कोल्हे यांनी आभार मानले.
मुलांना नकार ऐकायची सवय लावा
आपल्या मुलांना नाही ऐकायची सवय लावा, त्यांना सहजपणे सर्व उपलब्ध करून देत आपण त्याचे पुढील आयुष्य खराब करीत असतो. जीवनात संकट, अडचणी, आव्हान याचा सामना करण्याची त्यांची शक्ती वाढली पाहिजे. आज अनेक पालक मुलांना गाड्या, मोबाइल व इतर अनावश्यक बाबी अगदी लहान वयात हातात देतात. ही मुले पुढे हमखास नैराश्यामध्ये पडतील. त्यांना अनेक आजार जडतील. त्यांना अभ्यासाचा ताण देऊ नका. इतरांशी स्पर्धा, तुलना करू नका, त्यांना भरपूर खेळू द्या, असेही ते म्हणाले.
का जगायचे हे शोधा..
यावेळी डॉ.सावजी म्हणाले, की प्रत्येकाला आपल्या जीवनासाठी उदात्त हेतू असणे आवश्यक आहे. फक्त मी व माझे केल्याने आजार बळावतात. का जगायचे, हे शोधा म्हणजे कसे जगायचे, हा प्रश्न पडणार नाही.
-