श्रीरामचंद्रांनी लोणार तिर्थयात्रा केल्याची अख्यायीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 11:24 AM2020-08-09T11:24:29+5:302020-08-09T11:25:21+5:30
लोणार सरोवर परिसराची त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांसह, लक्ष्मण, सिता यांनी यात्रा केल्याची अख्यायिका सांगण्यात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार: प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने लोणार सरोवर परिसर पावन झाल्याची धारणा या भागातील नागरिकांमध्ये असून लोणार सरोवर परिसराची जवळपा सव्वा महिना त्यांनी तिर्थयात्रा केल्याची अख्यायीका येथे सांगितल्या जाते. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीतील श्रीराम वनगमन संस्थेच्या सदस्यांशी संशोधनाच्या दृष्टीने लोणार येथे दोन वर्षापूर्वी भेट दिली होती, अशी माहिती समोर आली आहे.
यास लोणार येथील सरोवर अभ्यासक तथा इतिहास संशोधक प्रा. डॉ. सुरेश मापारी यांनीही दुजोरा दिला आहे. यापूर्वी २० नोव्हेंबर २०१८ मध्ये या संस्थेनेने लोणार येथे भेट दिली होती, अशी माहिती मापारी यांनी दिली. लोणार सरोवर परिसरातील माहिती या भागात प्रचलीत असलेल्या कथांच्या संदर्भानेही त्यांनी या समितीला माहिती दिली असल्याचे ते म्हणाले. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमीपुजन पाच आॅगस्ट रोजी झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोणार संदर्भात माहिती घेतली असता ही बाब समोर आली.
दरम्यान, लोणार सरोवर परिसराची त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांसह, लक्ष्मण, सिता यांनी यात्रा केल्याची अख्यायिका सांगण्यात येते. संक्दपुराण, पद्मपुराण, रायमायणासारख्या ग्रंथातून लोणारचे सरोवर हे कृतयुगामध्ये निर्माण झाल्याचे संदर्भ येतात, असे सांगण्यात येते.
वाल्मिकी रामायणामध्ये लोणार सरोवराला ‘पंचाप्सर सरोवर ’ म्हणत असे संदर्भ येतात तर महाकवी कालिदास रचित ‘रघुवंश’ या ग्रंथामध्येही याला पंचाप्सर सरोवर म्हंटले असल्याचे डॉ. मापारी यांनी सांगितले. वैज्ञानिक दृष्टीकोणातून विचार करता लोणार सरोवराची निर्मिती ही ५० हजार वर्षापूर्वी उल्कापातामुळे निर्माण झाल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. प्रभू श्रीरामचंद्र तीर्थयात्रेसाठी लोणारला आले होते.
सव्वा महिना लोणार परिसरात
चौदा वर्षाच्या वनवासाच्या काळात जवळपास सव्वा महिना लोणार परिसरात त्यांनी वास केल्याचे सांगितले जाते. लोणार येथे विरजतिर्थ धार, पापहरेश्वर तिर्थ, कमळजा मातेचे दर्शन, घेतल्याची अख्यायिका आहे. रामगया येथेही काही काळ वास केला होता. त्यानंतर येथे मोठे हेमाडपंथी मंदिर निर्माण झाले. त्याला रामेश्वर महादेव मंदिर असे नाव आहे. आज येथे असलेल्या श्रीराम कुंडालाही एक मोठे महत्त्व आहे. रामगया येथे त्यांनी वडिलांचे श्राद्ध केले होते.