रोपवाटिकेतील कर्मचाऱ्यावर बिबट्याचा हल्ला; नळगंगा नजीकच्या घटना, परिसरात खळबळ
By निलेश जोशी | Updated: June 30, 2024 18:22 IST2024-06-30T18:22:37+5:302024-06-30T18:22:48+5:30
तालुक्यातील नळगंगा धरणानजीक सामाजिक वनीकरण विभागाची रोपवाटिका आहे. या रोपवाटिकेत सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचारी नारायण सैरीसे (रा. खामगाव ह. मु. मोताळा) व काही मजूर काम करतात.

रोपवाटिकेतील कर्मचाऱ्यावर बिबट्याचा हल्ला; नळगंगा नजीकच्या घटना, परिसरात खळबळ
मोताळा : रोपवाटिका मध्ये काम करत असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. ही घटना नळगंगा धरणानजीकच्या रोपवाटिकेत २९ जूनच्या सायंकाळी घडली. नारायण श्रीराम सैरीसे (३०) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे.
तालुक्यातील नळगंगा धरणानजीक सामाजिक वनीकरण विभागाची रोपवाटिका आहे. या रोपवाटिकेत सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचारी नारायण सैरीसे (रा. खामगाव ह. मु. मोताळा) व काही मजूर काम करतात. दरम्यान, २९ जूनच्या सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास सर्व मजूर कामावरून परत गेल्यावर नारायण सैरीसे हे रोपवाटिकेतून बाहेर निघत होते. यावेळी त्यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी सैरीसे यांनी आरडाओरडा केला असता, नर्सरीसमोरून जाणाऱ्या काही नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. मात्र या हल्ल्यात नारायण सैरीसे यांच्या पाठीला दुखापत झाली आहे. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल प्रशांत राजपूत व रोजगार सेवक संदीप मापारी यांनी जखमी नारायण सैरीसे यांना उपचारासाठी मोताळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, सामाजिक वनीकरण आणि वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
--नर्सरीत दोन बिबट्यांचा मुक्त संचार; वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष--
तीन ते चार दिवसांपूर्वी नारायण सैरीसे यांना या रोपवाटिकेत दोन बिबट मुक्त संचार करताना दिसून आले. यावेळी सैरीसे यांच्या सोबत असलेल्या नर्सरीतील कुत्र्यांनी बिबट्यांच्या दिशेने भुंकायला सुरुवात केली. तसेच सैरीसे यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे दोन्ही बिबट्यांनी पळ काढला. ही बाब सैरीसे यांनी मोताळा सामाजिक वनीकरणचे आरएफओ शिपे यांच्या कानावर घातली होती. परंतु यावर कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. त्यानंतर सैरीसे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच उपाययोजना केली असती तर ही घटना घडली नसती, अशी चर्चा आहे.