बिबट्या,रोही मृत अवस्थेत आढळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:08 AM2017-07-18T00:08:18+5:302017-07-18T00:08:18+5:30

घातपात की शिकार! ; जानेफळ शिवारातील घटना

Leopard, Rohi found dead! | बिबट्या,रोही मृत अवस्थेत आढळले!

बिबट्या,रोही मृत अवस्थेत आढळले!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जानेफळ : गावाला लागूनच असलेल्या मळी नामक शेतशिवारात बिबट्या व रोही हे दोन प्राणी १६ जुलै रोजी मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर दोन्ही प्राणी वाहत्या नाल्याकाठी दाट झुडुपात पडलेले असल्याने हा घातपात की शिकार? अशी जोरदार चर्चा संपूर्ण परिसरात होत आहे. याचा उलगडा करण्याचे आवाहन वन विभागासमोर उभे ठाकले आहे.
जानेफळ गावाला लागूनच पूर्वेस मळी नामक शेतशिवार असून, त्याला लागूनच वन विभागाची निंबा बिट आहे, तर गट क्र.१०५ मळी शिवारातील श्याम मांगीलाल गट्टाणी यांच्या मालकीच्या शेतातून एक मोठा पाण्याचा नाला गेलेला असून, त्याच्या काठावर एक बिबट्या व बाजूलाच रोहीसुद्धा मृत अवस्थेत आढळून आला आहे. सदर पाण्याच्या नाल्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या काही लोकांना सदर दोन्ही प्राणी मृत अवस्थेत पडलेले दिसल्याने त्याची गेल्या २ ते ३ दिवसांपासून दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.
सदर चर्चा वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी तसेच शिवसेना शहर प्रमुख शिवाजी मुरडकर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविल्याने जिल्हा उपवनसंरक्षक भगत, वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम. पाटील, वनपाल एस.डी.परिहार आदींनी १६ जुलै २०१७ रोजी रात्री दरम्यान जानेफळ येथील मळी नामक शिवारातील श्याम मांगीलाल गट्टाणी यांच्या शेतात धाव घेतली. त्यावेळी त्यांना कुजलेल्या अवस्थेत असलेला बिबट्या व रोही आढळून आले. त्यानंतर रात्रभर सर्च आॅपरेशन राबविण्यात येऊन १७ जुलै रोजी पशुवैद्यकीय अधिकारी डुघ्रेकर यांनी दोन्ही प्राण्यांचे शवविच्छेदन केले आहे. सदर घटनेतील बिबट्या व रोही हे कुजेपर्यंत वन विभागाला खबर नसल्याने तसेच सदर शेतमालकाने सुद्धा आपल्या शेतातील घटनेची माहिती वन विभागाला कळविली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या शिवारात सध्या रानडुक्कर, रोही, हरीण, काळविट किंवा इतर काही जंगली प्राण्यांच्या शिकारीचा प्रकार वन विभागासाठी फारसा गंभीर राहिलेला नाही. त्यामुळे सर्रास या वन्य प्राण्यांच्या शिकारी सुरु आहेत; मात्र वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी याकडे डोळेझाक करीत असल्याने बिबट्या व रोहीसारख्या प्राण्यांचे जीवनसुद्धा धोक्यात आल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते. सदर बिबट्या व रोही शेतातील झुडुपात मृतावस्थेत पडलेले असल्याचे तसेच बिबट्याच्या पोटावर जळाल्याचा मोठा काळा डागसुद्धा असलेला फोटो अनेकांच्या मोबाइलवर व्हायरल झाल्याची जोरदार चर्चा सुरु असून, यावरून सदर घटना ही घातपाताचा प्रकार असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे याचा छळा लावण्यासाठी वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठित करून सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल
सदर घटनेप्रकरणी वन विभागाकडून गुन्हा रिपोर्ट नं.५४६/१८ वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम ९,३९ महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे नियम ९ (१) ड, ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपवनसंरक्षक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम.पाटील, वनपाल एस.डी.परिहार, पी.डी.सावळे, एस.डी.नागरे आदी करीत आहेत.

सदर शेतमालक श्याम मांगीलाल गट्टाणी व शेतातील राखणदार तसेच माळेगाव येथील काही लोकांना चौकशीसाठी बोलविण्यात आलेले असून, सदर बिबट्याच्या व रोह्याच्या मृत्युचा छडा लावण्यात येईल.
- लक्ष्मण पाटील
प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी, घाटबोरी वनपरिक्षेत्र.

घटनास्थळाच्या शेतासोबतच आजूबाजूच्या शेतमालकांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे, तसेच परिसरात स्वत: मी फिरून कुठे तार कुंपण आहे का? तसेच एखाद्या विषारी द्रव्यांचा डबा सापडतो काय? याची पाहणी केली आहे; परंतु तसे काहीच आढळून आले नसून, याप्रकरणी वनरक्षक व वनपालाविरुद्ध निष्काळजीपणाबद्दल महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल १९७९ नुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
- बी.टी.भगत, उपवनसंरक्षक बुलडाणा.

Web Title: Leopard, Rohi found dead!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.