कवळगाव बिटमध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 10:25 AM2020-11-10T10:25:42+5:302020-11-10T10:29:25+5:30

Leopard News कवळगाव येथील बिट क्रमांक २६८ मध्ये गेल्या दोन दिवसांपासून दुर्गंधी येत होती.

A leopard was found dead in Kavalgaon bit | कवळगाव बिटमध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला

कवळगाव बिटमध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला

Next
ठळक मुद्देगावकऱ्यांनी माहिती दिल्यावर वनविभागाला आली जाग.बिट क्रमांक २६८ मध्ये गेल्या दोन दिवसांपासून दुर्गंधी येत होती.

पिंपळगाव राजा : पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कवळगाव परिसरात ज्ञानगंगा अभयारण्याच्या हद्दीमध्ये सोमवारी सकाळी ग्रामस्थांना बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती वनविभागाच्या व वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली असता अधिकारी दुपारच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले, मात्र सायंकाळपर्यंत मृत बिबट्याचे शवविच्छेदन न झाल्याने वन्यजीव विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाची कर्तव्यप्रति किती सजगता आहे, हे या घटनेवरून समोर आले आहे. वन्यजीव विभागाच्या कवळगाव येथील बिट क्रमांक २६८ मध्ये गेल्या दोन दिवसांपासून दुर्गंधी येत होती. आजूबाजूच्या शेतकरी व शेतमजुरांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता बिबट्या मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळाल्याच्या काही तासानंतर वन्यजीव विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहचले. वनपरिक्षेत्र अधिकारी महेश धंदर घटनास्थळी दाखल झाले. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. मात्र पशुवैद्यकीय अधिकारी हे बाहेरगावी असल्याने मृत बिबट्याचे शवविच्छेदन झाले नाही. वनरक्षक एन.डी. तुपकर यांच्याकडे ही बिट असून ते या बीटमध्ये न फिरकल्याने नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. नपरिक्षेत्र अधिकारी धंदर यांनी चौकशी करून दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

- हद्द कुणाची, वन्यजीव की प्रादेशिक वनविभागाची 

वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश धंदर, वनपाल विनकर,वनरक्षक एन. डी. तुपकर हे घटनास्थळी दाखल झाल्यावर हद्द कुणाची वन्यजीव विभागाची की प्रादेशिक वनविभागाची असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. त्यामुळे काही काळानंतर ही हद्द वन्यजीव विभागाची असल्याचे स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर कुठेतरी वन्यजीव विभागाने बिबट्याच्या पंचनाम्यासाठी व शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे धाव घेतली.

बिबट्या मृतावस्थेत आढळल्याचे समजताच घटनास्थळी दाखल झालो. पशुवैद्यकीय अधिकारी यांना बिबट्याचे शवविच्छेदन करण्यासाठी बोलावले असता सायंकाळ झाल्याने ते होऊ शकले नाही, उद्या सकाळी शवविच्छेदन केले जाणार आहे.

-महेश धंदर वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव विभाग खामगाव

Web Title: A leopard was found dead in Kavalgaon bit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.