कृष्ठरोगाचा एनसीडीआर ५.४१ वर; दहा हजार रुग्णांमागे ०.४४ प्रमाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 02:08 PM2020-01-31T14:08:57+5:302020-01-31T14:09:22+5:30
बुलडाणा जिल्ह्याचा कृष्ठरोग एनसीडीआर (ॅअॅन्युअल न्यु केस डिटेक्शन रेट) हा ५.४१ असून जिल्ह्यात प्रतीहजारी कृष्ठरोग रुग्ण आढळण्याचे प्रमाण आहे.
बुलडाणा: महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी व जागतिक कृष्ठरोग निवारण दिनानिमित्त येथील सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कृष्ठरोग) कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान बुलडाणा जिल्ह्याचा कृष्ठरोग एनसीडीआर (ॅअॅन्युअल न्यु केस डिटेक्शन रेट) हा ५.४१ असून जिल्ह्यात प्रतीहजारी कृष्ठरोग रुग्ण आढळण्याचे प्रमाण हे अवघे ०.४४ टक्के असल्याची माहिती यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिली.
जिल्ह्यात ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत कृष्ठरोग निवारण पंधरवाड्यानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत असून या पंधरवाड्यास प्रारंभ झाल्यानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमास सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कृष्ठरोग) च्या डॉ. चारूशिला पाटील, डॉ. ए. बी. शिंदे, वैद्यकीय सहाय्यक राजू धुड, अनिल रिंढे, संजय चोपडे, देशमुख, शेळके व अन्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. चारुशिला पाटील यांनी कृष्ठरोग निर्मुलन हे महात्मा गांधी यांचे एक स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, असे सांगून त्यांच्या जीवन कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. दरम्यान उपस्थित मान्यवरांनीही यावेळी माहिती दिली. बुलडाणा जिल्ह्यात चालू वर्षात ९८ रुग्ण हे उपचार मुक्त झाल्याची माहिती देण्यात आली. सोबतच सध्या १३२ रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. अलिकडील काळात कृष्ठरुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. मधल्या काळात २१ लाख १५ हजार ९४६ नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. त्यात ५५ जणांना कृष्ठरोगाची बाधा झाल्याचे समोर आले होते, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस सुताचा हार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.