बुलडाणा जिल्ह्यात १२५ शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 11:58 AM2021-02-23T11:58:15+5:302021-02-23T11:58:29+5:30
Schools in Buldana district बुलडाणा जिल्ह्यात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १२५ शाळा आहेत. या
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : राज्यभरात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणे किंवा त्या शाळा लगतच्या शाळांत समायाेजित करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १२५ शाळा आहेत. या शाळा इतर शाळांत समायाेजित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण भागातही इंग्रजी काॅन्व्हेंटचे प्रस्थ वाढले आहे. त्यामुळे जि.प. शाळांची पटसंख्या कमी हाेत असल्याचे चित्र आहे.
विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेल्या शाळांवर शिक्षकांच्या वेतनाचा व इतर खर्च करणे शक्य नसल्याने शासनाने या शाळा बंद करण्याचा किंवा इतर शाळांमध्ये त्यांचे समायाेजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पटसंख्या कमी असलेल्या शाळांचा शिक्षण विभागाकडून शाेध घेण्यात येत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १४३८ शाळा आहेत. त्यापैकी पटसंख्या नसल्याने दाेन शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच १२५ शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे.
शहरांसह खेड्यांमध्येही काॅन्व्हेंट सुरू झाले आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर हाेत आहे. त्यामुळे शासनाने कमी पटसंख्या असलेल्या बंद करण्याचा किंवा त्यांचे समायाेजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे समायाेजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या शाळेतील शिक्षकांना इतर जिल्हा परिषद शाळेत समायाेजीत करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी प्रवास भत्ता किंवा इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येइल.
- सचिन जगताप, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. बुलडाणा