‘मुलीला जगू द्या.. हे जग तिचे आहे’ - सुमन चंद्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 03:10 PM2020-01-07T15:10:45+5:302020-01-07T15:10:54+5:30
मुलीला जगू द्या.. हे जग तिचे आहे. प्रत्येकाने स्त्री जन्माचे स्वागत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : वंशाला दिवाच पाहिजे, ही मानसिकता आता समाजाने झिटकारायला पाहिजे. या मानसिकतेमुळे स्त्री भृणाची गर्भातच हत्या होत आली आहे. ही मानसिकता समाजाला लागलेली किड आहे. मुलीला जगू द्या.. हे जग तिचे आहे. प्रत्येकाने स्त्री जन्माचे स्वागत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज केले.
‘बेटी बचाओ - बेटी पढाओ’ अभियानातंर्गत कार्यशाळेचे आयोजन आयएमए सभागृह येथे सोमवारी करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) साजिद आरिफ सय्यद, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड देवकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा आरोग्य अधिकारी कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुटूंबे, डॉ. जे. बी राजपूत, माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. गोफणे, डॉ. वसू आदी उपस्थित होते.
स्त्री भ्रुण हत्येचे प्रमाण वाढण्यासाठी जनजागृती बरोबरच सर्वांनी सजग राहण्याची आवश्यकता असल्याचे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या, डॉक्टरांच्या सहकार्याशिवायही स्त्री भ्रुण हत्या होऊच शकत नाही. डॉक्टरांनी संवेदनशील राहून या प्रकाराला आळा घालावा. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पाटील, न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) साजिद आरिफ सय्यद, अॅड. देवकर, डॉ. वसू यांनीही आपले मत मांडले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडीत यांनी प्रास्ताविक केले. संचलन सोळंके यांनी तर आभार प्रदर्शन सुनील जोशी यांनी मानले. कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती, नागरिक, महिला यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भोंडे, काकडे यांच्याहस पीसीपीएनडीटी समितीचे पदाधिकारी, जिल्हा रूग्णालयातील संबंधित शाखेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.