सहभागासाठी ४५ संस्थांना पत्र
By admin | Published: August 13, 2015 12:09 AM2015-08-13T00:09:51+5:302015-08-13T00:09:51+5:30
सामूहिक शपथ अभियानात खामगाव नगरपालिकेचा पुढाकार.
अनिल गवई / खामगाव (जि. बुलडाणा) : स्वच्छता, प्लास्टिक निर्मूलन, पाणी बचत आणि वृक्ष रोपट्यांच्या लागवडीसोबतच वृक्ष रोपट्यांच्या संगोपनामध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी खामगाव नगरपालिकेच्यावतीने स्वातंत्र्यदिनी यंदा प्रथमच सामूहिक संकल्प आणि शपथ अभियान आयोजित केले आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध सामाजिक संस्थांसह खासगी तसेच महापालिका शाळांतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना पालिकेकडून पत्र देण्यात येत असून, बुधवारी दुपारपर्यंंत ४५ संस्थांना पत्र देण्यात आल्याची माहिती आहे. नगरपालिका प्रशासनाच्यावतीने शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. कचरा निर्मूलनासाठी घरोघरी घंटागाडी हा उपक्रमही राबविण्यात येतो; मात्र तरीही या उपक्रमांमध्ये नागरिकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. प्लास्टिक निर्मूलनासोबतच वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाच्या बाबतीतही नागरिकांचा अपेक्षीत सहभाग मिळत नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घेत, नगरपालिका प्रशासनाने प्रत्येक उपक्रमात आणि अभियानात नागरिकांचा सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने स्वातंत्र्यदिनी सामूहिक शपथ अभियान राबविण्यात येणार आहे. अस्वच्छता, पाणीटंचाई या गोष्टींवर मात मिळविण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक आणि शालेय विद्यार्थ्यांंच्या सहभागातून ह्यस्वातंत्र्य संकल्प आणि शपथ अभियानह्ण शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता पालिकेतील स्व. विलासराव देशमुख प्रशासकीय इमारतीत हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या अभियानाच्या यशस्वितेसाठी पालिका प्रशासनाने तयारी चालविली आहे. पालिकेतील नगरसेवक विविध विषय सभापती, पालिका शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापक हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या उपक्रमाला माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.